श्री दत्त साखरच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास सुरुवात

श्री दत्त साखरच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास सुरुवात

Loading

शिरोळ : प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर शिरोळ कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास श्री दत्त आरोग्य केंद्र मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभदा कासनाळे-फल्ले यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने सुरुवात केली.
शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या संकल्पनेतून शिरोळ तालुका व कर्नाटक सीमाभागातील सभासद, नागरिकांच्या वैद्यकीय सोयीसाठी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्त आरोग्य केंद्र उभे आहे. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, आरोग्य व शिक्षण संचालक अंबाप्रसाद नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभदा कासनाळे -फल्ले व आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ कामगारांसह सर्व सभासद व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 तास सज्ज असतात. मिरजेतील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ येथे प्रत्येक आठवड्याला भेट देऊन सेवा देत असतात.
श्री दत्त आरोग्य केंद्राच्या वतीने दुसऱ्या जिल्ह्यातून ऊस तोडीच्या निमित्ताने आलेल्या ऊसतोड कामगार मजूर व त्यांच्या नातेवाईकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे तथा सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्या 07/10/2025 रोजीच्या पत्रानुसार मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये डॉ. कुमार पाटील, डॉ. शुभदा फल्ले, श्रीकांत निर्मळे, सिस्टर सौ. भाग्यश्री भोसले, क्ष किरण तंत्रज्ञ किरण भोसले, अंबुलन्स ड्राइवर राजू जाधव यांच्यासह स्टाफचा समावेश करण्यात आला आहे. या पथकाच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांच्या खोपटावर जाऊन त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.