इलेक्शन फीवर आजऱ्यात वाढला: घडामोडींना वेग

Loading

आजरा : प्रतिनिधी

इलेक्शनचे वारे वाहू लागले असून आजरामध्ये आता निवडणुकीचा ताप वाढतच चाललाय. इच्छुकांची भाऊ गर्दी आणि निवडून येण्याची उत्सुकता यामुळे हा ताप भयानक वाढत चाललाय. त्यातच आजरा नगरपंचायतीचे निवडणूकीचे नगारे वाजल्याने आजऱ्याच्या राजकारणाचे तापमानही वाढत आहे. दुसरीकडे युवकांनी प्रस्थापिताना दिलेले आव्हान यामुळे घडामोडीना वेग येणार ही निश्चित आहे.

युवकांनी प्रस्थापिताना थेट आव्हान देत रिंगणात उतरण्याची तयारी केली असून 17 प्रभागात 9 महिला सदस्या आहेत. त्यामुळे महिलाराजचे वर्चस्व जरी असले तरी नगराध्यक्ष पद हे पुरुष खुले असल्याने अनेकजण यात इच्छुक आहेत. अनुसूचित जाती प्रवार्गासाठी 1, मागास प्रवार्गासाठी 3, सर्वसाधारण महिलासाठी 5, इतर प्रवार्गासाठी 2 तर 6 जागा खुल्या प्रवार्गासाठी आहेत. आणि नागराध्यक्ष पद खुले असल्याने यासाठी अनेकांच्या हालचाली सुरु आहेत. नागराध्यक्ष पदासाठी सद्या अशोकआण्णा चराटी, अबूताहेर तकीलदार,संजयभाऊ सावंत, मंजूर मुजावर, संभाजी पाटील,अभिषेक शिंपी हे प्रामुख्याने इच्छुक आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

कोण कुणाला मिठी मारणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. मागच्या निवडणूकीमध्ये अशोकआण्णा चराटी यांनी आपल्या कन्येला नगराध्यक्ष पदावर विराजमान करण्यात यश संपादन केले. यावेळेस नगराध्यक्ष पद खुले असल्याने नागराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रस्थापिताना युवा पिढीकडून विरोध जरी होताना दिसत असला तरी बीजेपी कडून अशोकआण्णा चराटी तर काँग्रेसकडून त्यांना टक्कर देणारा प्रतिस्पर्धी देण्यासाठी चाचपणी सुरु आहे. सद्या अशोकअण्णांच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटले असून विरोधकांच्या आघाडीत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारगट, शिंपी गट, मुस्लिम युवा गट त्याचप्रमाणे बीजेपीची जुनी नाराज मंडळी एकत्रित येण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे अशोकअण्णांची म्हणावी तितकी वाट सोपस्कर वाटत नाही. आजच्या घडीला अशोकअण्णांना कडवी टक्कर देणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून भगवा रक्षकचे संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ सावंत यांचे नाव कार्यकर्त्याकडून पुढे येत आहे. तर मुस्लिम समाज एकत्र येत नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार दिला तर बाजू पलटू शकते. आजच्या घडीला अबूताहेर तकीलदार हे मुस्लिम समाजातून इच्छुक असून त्यांनी मागील महिन्यापासूनच आपली फिल्डिंग लावली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी त्यांच्या सुरु आहेत. परंतु मुस्लिम समाजातूनही अनेकजण इच्छुक असल्यामुळे त्यांनाही तेवढे सोपस्कर दिसत नाही. एकंदरीत या नगरपंचायतिमध्ये अनपेक्षित घडमोडी घडणार हे नक्की.