प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळाले पाहिजे ही माझी भूमिका : आमदार यड्रावकर

Loading

शिवनाकवाडी येथे ६० कुटुंबांना ७ /१२ पत्रकाचे वाटप

जयसिंगपूर : प्रतिनिधी
प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, ही माझी भूमिका असून अनेक वर्षांपासून न्यायासाठी धडपडणाऱ्या या नागरिकांना अखेर हक्क मिळवून देण्यात यश आले, याचा मला अत्यंत आनंद आहे, गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या या कुटुंबांना आज न्याय मिळाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान मिळाले आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिवनाकवाडी येथील गट नंबर ३४५ मधील ६० कुटुंबांना ७ / १२ पत्रकाचे वाटप व पाणंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिवनाकवाडी येथील ६० नागरिकांना सन १९७९ व १९८९ साली भूखंड देण्यात आले होते, मात्र सातबाऱ्यावर नाव नोंद न झाल्याने हे सर्व कुटुंब घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना, बँक कर्ज अशा विविध शासकीय निमशासकीय सुविधांपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शिरोळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून झाले, अखेर हक्काची जागा त्यांच्या नावावर झाल्याने त्यांचे भवितव्य उज्वल होणार आहे. त्याचबरोबर गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे, या निधीच्या माध्यमातून गावचा विकास साधला जात आहे, यापुढेही शिवनाकवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी दत्त कारखान्याचे संचालक रणजीत कदम, सरपंच सरिता खोत, उपसरपंच अश्विनी खोत, सर्कल कुंभार, ग्रामपंचायत अधिकारी व्ही.टी. कोळी, महसूल अधिकारी अविनाश तांबवेकर,
भूपाल खोत, सुशीला खोत, सुवर्णा काटकर, श्रीकांत आरगे, सतीश बरगाले, राजाराम खोत, गणपती उमराणे, श्रीकांत खोत, कुंतीनाथ बरगाले, रावसो आरगे, बाळासो डांगे, विवेक खोत, धोंडीराम खोत, विजय खोत, दगडू भिलवडे, महादेव कोळी, गणेश कुरणे, आशा खोत, सुवर्णा काटकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.