![]()
कृषी व वस्त्रोद्योग विषयक केली सविस्तर चर्चा
जयसिंगपूर : प्रतिनिधी
मुंबई येथील महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एग्रीकल्चर च्या कार्यालयाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट देऊन अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्याशी चर्चा केली. या भेटीदरम्यान राज्याच्या व्यापार, शेती आणि वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आमदार यड्रावकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा देशातील औद्योगिक आणि कृषी विकासाच्या दृष्टीने अग्रेसर राज्य असले तरी, आजही ग्रामीण भागातील उत्पादक आणि लघुउद्योगांना बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर शासनाने व्यापार सुलभता, निर्यात प्रोत्साहन आणि वस्त्रोद्योगासाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी चेंबर्सतर्फे राज्यातील व्यापारी, उद्योगपती आणि शेतकऱ्यांना अधिक सहाय्य मिळावे यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यात समन्वय वाढवून व्यापार वृद्धीची दिशा ठरवली जाईल.
या चर्चेत शेती उत्पादनांचे मूल्यवर्धन, निर्यात वाढविण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा, तसेच वस्त्रोद्योगातील कौशल्यविकास कार्यक्रम यावर सविस्तर विचारविनिमय झाला. आमदार यड्रावकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी धोरणात्मक बदलांची गरज आहे. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा अध्यक्ष रवींद्र माणगावे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, कार्यकारणी सदस्य दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्यकारिणी सदस्य शरद सूर्यवंशी, अण्णासाहेब पाटील, सभासद विलास आडके, रामचंद्र डांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
