शिरोळ तालुक्यातील ११ गावांतील तांडा वस्त्यांसाठी तब्बल १ कोटींचा निधी : आमदार यड्रावकर

शिरोळ तालुक्यातील ११ गावांतील तांडा वस्त्यांसाठी तब्बल १ कोटींचा निधी : आमदार यड्रावकर

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत शिरोळ तालुक्यातील तब्बल ११ गावातील तांडा-वस्त्यांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, गटर्स बांधकाम, समाजमंदिर आणि इतर मूलभूत सुविधा उभारणीची कामांसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, दानोळी, अर्जुनवाड, कोथळी, दत्तवाड, तमदलगे, यड्राव, उदगाव, शिरढोण, हेरवाड आणि धरणगुत्ती या गावांतील वस्ती सुधारणा कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. संबंधित गावांमध्ये काँक्रिट रस्ते, गटर्स बांधकाम अशा विकासकामांवर प्रत्येकी सुमारे १० लाख रुपये निधी मंजूर झाला असून, एकूण अंदाजे १ कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी खर्च होणार आहे.
अब्दुललाट येथील बिरदेव मंदिर समोरील जागेत काँक्रिटीकरण करणे व चौधरी येथे दुतर्फा गटर्स बांधणे याकरिता १० लाख रुपयांचा निधी , दानोळी येथील नंदीवाले वसाहत मानाजी नंदीवाले घर ते महेश नंदीवाले यांच्या घरापर्यंत व राजाराम नंदीवाले यांचे घर ते बबन नेजकर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, अर्जुनवाड येथील बिरदेव मळ्यात कॉक्रीटीकर करणे ५ लाख, कोथळी येथील नंदिवाले बालाजी नगर रस्ते कॉक्रीट करण करणे व गटर्स बांधणे १० लाख, दत्तवाड येथे वडर वसाहत रस्ते व गटर्स करणे १० लाख, मौजे तमदलगे नंदीवाले वसाहत रस्ता व गटर्स करणे १० लाख, हेरवाडच्या बिरदेव नगरमध्ये रस्ता व गटर्स करणे १० लाख, उदगावच्या धनगर गल्लीत काँक्रिट रस्ता तयार करणे १० लाख, यड्रावमधील पडीयार वसाहत, तमदलगेतील नंदिवाले वसाहत प्रत्येकी १० लाख, शिरढोण येथील माळभाग पाटील गल्ली रस्ते व गटर्स करणे १० लाख, धरणगुत्ती गोसावी समाज वस्ती रस्ते व गटर्स करणे १० लाख असा एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या कामांमुळे वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे.
या निर्णयामुळे मागासवर्गीय वस्त्यांतील नागरिकांना स्वच्छ, सुस्थित आणि सुलभ दळणवळण सुविधा मिळणार असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. हा निधी मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, इतर मगास व बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांचे आमदार यड्रावकर यांनी आभार मानले आहेत.