गोकुळ संघाचा “वसुबारस पूजन” मोठ्या उत्साहात

Loading

शेकडो दूध उत्पादकांची उपस्थिती : ‘गोकुळ आईस्क्रीम’ लवकरच बाजारात येणार

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचा पारंपरिक वसुबारस पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळ, संघाचे अधिकारी व शेकडो महिला दूध उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते. पारंपरिक विधीने गायीचे पूजन करण्यात आले. ‘गोकुळ चीज’ आणि ‘गोकुळ गुलाबजामून’ या नव्या पदार्थांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘गोकुळ आईस्क्रीम’ लवकरच बाजारात येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले.

दूध उत्पादकांसाठी गोकुळ संघाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय व म्हैशीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये म्हैस दूध ५१.५० वरून ५२.५० रुपये व गाय दूध ३३ वरून ३४ रुपये करण्यात आले असून ‘महालक्ष्मी गोल्ड’ आणि ‘कोहिनूर डायमंड’ या पशुखाद्यांच्या मूळ विक्री दरात ५० किलो पोत्यावर ५० रुपये सवलत देण्यात आली आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत या योजनेतून दूध उत्पादकांना ५.५ कोटींचा लाभ मिळणार असून संस्था व्यवस्थापन खर्च ९० पैशांऐवजी १ रुपये (१० पैशांची वाढ) करण्यात अली आहे. याचा ६ कोटींचा वार्षिक भार संघावर पडणार असून गाभण जनावरांसाठी नवीन ‘महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन’ बाजारात आणण्यात आले आहे. यामुळे प्रसूती सुलभ होते, रेडके/वासरे निरोगी जन्माला येतात आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरी कारभारामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत म्हैस दूध खरेदी दरात तब्बल १४ रुपये तर गाय दूध खरेदी दरात ८ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाचा पारदर्शक व काटकसरी कारभार कसा अधिक लाभदायक ठरू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. तर “संघ सध्या डिबेंचरवर ७.८% व्याज देत असून जे शेअर्समध्ये रूपांतर झाले असून त्यांना ११ % व्याज मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण करून उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले. या विषयावर संघाने पूर्ण पारदर्शकता ठेवली असून डिबेंचर्स विषयावर पुढे बोलताना त्यांनी “संघामार्फत सर्व दूध संस्थांना विश्वासात घेऊन, त्यांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी आणि या विषयाचा तज्ञ समितीकडून अभ्यास करून एक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आता आपले एकमेव उद्दिष्ट गोकुळचे संकलन २५ लाख लिटरपर्यंत नेणे असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी विशेषतः शेतमजूर व अल्पभूधारक उत्पादकांना अधिक प्रोत्साहन देऊन संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन केले. तर संघाचे बळ हे सामूहिक प्रयत्नांत असून गोकुळ दूध संघाचे संकलन, उत्पादकांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार यांच्या जोरावर अधिक सक्षम बनविण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी “गोकुळने गेल्या साडेचार वर्षांत पारदर्शक कारभार ठेवत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असून दूध दरवाढ, पशुखाद्य अनुदान, संस्थेचा मार्जिन वाढविणे हे सर्व निर्णय शेतकऱ्यांसाठी केले गेले आहेत. असे सांगितले. सर्व विषयांचे समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. असा विश्वास त्यांनी दिला.

स्‍वागत कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी तर प्रस्ताविक माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. आमदार चंद्रदीप नरके, माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. आभार संचालक अभिजित तायशेटे यांनी मानले. गोकुळ दूध संघाच्या या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि भावनिक पाठबळ मिळणार असून, वसुबारस आणि दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के.पी.पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *