डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळ्यासाठी जयसिंगपूर सज्ज

Loading

बौद्ध व बहुजन समाज उत्स्फूर्तपणे सहभाग घेणार

जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर शहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी गेली पाच दशकांपासून करण्यात येत होती. अखेर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून ही ऐतिहासिक मागणी पूर्णत्वास येत आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेले अभिवचन प्रत्यक्षात उतरल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगमना सोहळ्यासाठी जयसिंगपूर शहरात उद्या निळे वादळ निर्माण होणार आहे.
हा आगमन सोहळा थाटामाटात घेण्यात येणार असून शिरोळ तालुक्यासह परिसरातील बौद्ध समाज, बहुजन समाज आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पुतळा समितीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्रमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक भीमसैनिकाने या आगमन सोहळ्यास उपस्थित राहण्याची ग्वाही दिल्याने रविवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी जयसिंगपूर शहर सज्ज झाले आहे.
याआधी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा भव्यदिव्य पद्धतीने झाला होता. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचाही आगमन सोहळा दिमाखात पार पडणार आहे.
मिरवणुकीत महिला लेझीम पथक, दाक्षिणात्य ढोल पथक, डी.जे. साऊंड, डान्स ग्रुप, नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स, आकर्षक फटाक्यांची आतषबाजी, चित्ररथ, महिला दांडपट्टा व करबल पथकाचा समावेश असणार आहे. तसेच भीम कन्या दिव्या शिंदेही या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
ही भव्य मिरवणूक शिवतीर्थ येथून सुरुवात होऊन नांदणी नाका – दिनबंधू सोसायटी–बौद्ध विहारमार्गे क्रांती चौक येथे सांगता होणार आहे. संपूर्ण शहर प्रकाशझोतांनी उजळले असून, शिरोळ तालुका या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *