![]()
पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
जयसिंगपूर : प्रतिनिधी
उद्योगात प्रगती साधायची असेल तर उत्पादन खर्च कमी करणे अत्यावश्यक आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या विजेच्या खर्चामुळे उद्योगांवर मोठे ओझे येत आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक उद्योगाने सोलर सिस्टिमचा वापर केला पाहिजे. तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल, याकडे लक्ष केंद्रित केले तरच उद्योगांना स्पर्धेत टिकून राहणे शक्य आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
ते पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड, यड्राव यांच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार यड्रावकर बोलत होते.
आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या जागेवर इचलकरंजी शहराचा मैल खड्डा होणार होता, मात्र सहकार नेते शामरावआण्णा पाटील यांनी ही जागा उद्योग धंद्यांसाठी वापरून पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटची उभारणी केली. त्यामुळेच आज पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. रोजगार निर्मितीबरोबरच येथील उद्योगांनी सातत्याने प्रगती साधली आहे. आता काळानुरूप नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आजचे वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर उद्योग व्यवसायात करून उत्पादनक्षमता वाढवणे व गुणवत्तेत सुधारणा करणे शक्य आहे. उद्योजकांनी आपला दृष्टीकोन बदलून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले, तर उद्योग व्यवसायाला निश्चितच नवे बळ मिळेल.
सभेच्या प्रारंभी इंडस्ट्रियल इस्टेटचे संचालक महावीर पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्रद्धांजलीचा ठराव व्हा. चेअरमन महावीर खवाटे यांनी मांडला. विषयपत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करताना भविष्यातील उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या बाबी अधोरेखित केल्या. त्यांनी सांगितले की, सरकारी योजना, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि एकजुटीने काम केल्यास येथील उद्योग क्षेत्र देशभरात आदर्श ठरू शकते.
सभेला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, शरद देसाई, शिवकुमार पाटील, सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, संचालक ताजुद्दीन तहसीलदार, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, किरण बरगाले, अजय पाटील यड्रावकर, चंद्रकांत कांबळे, राहुल बंडगर, रत्नमाला गांधी, सुवर्णा पाटील, संजय बिडला, जैनुल बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक सभासद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रकाश अकिवाटे यांनी मानले.

