जयसिंगपुरात हातगाडी संघटनेकडून निषेध : खोकीधारक संघटनेची स्थापना

जयसिंगपुरात हातगाडी संघटनेकडून निषेध : खोकीधारक संघटनेची स्थापना

जयसिंगपूर : प्रतिनिधी

ज्या सर्वपक्षीय समितीने वाहतुकीस अडथळा होतो म्हणून ढकलगाडे काढण्यासाठी नगरपालिकेला निवेदन दिले त्याच्या निषेधार्थ मंगळवारी एक दिवस बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, यावेळी राजर्षी शाहू महाराज हातगाडी व खोकीधारक संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी कल्याणसिंग रजपूत तर उपाध्यक्षपदी हेमंत रसाळ यांच्यासह समितीची निवड करण्यात आली.
शहरातील हातगाडे व खोकीधारक यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. फुटपाथवरील असे व्यवसाय हटवावेत, अशी मागणी सर्वपक्षीय समितीने पालिका प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अशा मागणीचा निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील खोकीधारक व हातगाडी व्यावसायिकांनी बंद पाळला. सिध्देश्वर चौपाटी, बगीचा परिसर, नांदणी रोड, शहा पेट्रोलपंप परिसर, आश्रय हॉटेल परिसर, शिरोळवाडी रोड याठिकाणचे व्यवसाय बंद राहिले. या व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी संघटनेची स्थापना करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. त्याबाबत तातडीने बैठक घेवून संघटनेची स्थापना देखील करण्यात आली. अध्यक्षपदी कल्याणसिंग रजपूत, उपाध्यक्षपदी हेमंत रसाळ, सचिवपदी सागर मगदूम, खजिनदारपदी गणेश तावडे व तेराजणांची समिती नियुक्त करण्यात आली. काहींनी पतसंस्था, बचत गटाकडून कर्जे काढून उदरनिर्वाहासाठी हातगाडीच्या माध्यमातून अनेकांनी व्यवसाय सुरु केले आहेत. चुकीची व एकतर्फी पध्दतीने कारवाईची मागणी होत आहे. याचा आम्ही निषेध केला असल्याची माहिती रजपूत यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, राजर्षी शाहू खोकीधारक संघटना व सर्वपक्षीय समिती यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *