बस स्थानक बनले खाजगी वाहनांचा तळ : आजरा एसटी महामंडळाचे नवे रूप

Loading

आजरा : हसन तकीलदार

प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून सर्व सोयी नियुक्त अशी एसटी महामंडळाच्या आजारा बस स्थानकाची इमारत उभी राहिली खरी. मात्र हे एसटी स्टँड म्हणजे सध्या खाजगी वाहनांचा तळ बनला आहे. स्थानकावर थांबलेली एक चार चाकी वाहन उताराला लागताच आपोआप महामार्गावर आले. या प्रकारामुळे काही दोन चाकी गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी अथवा मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेवरून प्रवाशांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बस स्थानकासमोर संरक्षक भिंत उभारण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी सुविधेसाठी असलेल्या रिक्षा तेथे उभ्या करण्यास मात्र एसटी महामंडळाचे प्रशासन मज्जाव करीत आहे. मात्र अन्य खाजगी वाहने बेधडकपणे बस स्थानकाच्या परिसरात ये जा करीत असतात. याचे गौडबंगाल एक संशोधनाचा विषय आहे.
वृद्ध, अपंग, रुग्ण महिला प्रवासी यांना सोयीचे व्हावे तसेच प्रवाशांना तातडीने लगेच रिक्षा उपलब्ध व्हावी या हेतूने पूर्वीपासून स्टॅंडलगच रिक्षा स्टॉप अस्तित्वात होते. परंतु गत वर्षापासून अचानकपणे एस. टी. प्रशासनाने या रिक्षा थांब्याला बाहेर काढल्यामुळे महामार्गाच्या कडेला रिक्षा थांबा करावा लागला आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर अडचण होत आहे. रिक्षा थांब्यामुळे काय अडचण होते आणि यामागचे कारण काय आहे हे ही एक गूढ बनले आहे.

रिक्षा थांबा होता त्या ठिकाणी खाजगी चार चाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. अशीच एक थांबवलेली चार चाकी वाहन हँडब्रेक न लावल्याने उताराच्या दिशेने आपोआप महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेली व उभ्या असलेल्या टू व्हीलर गाडयांना थडकल्याने किरकोळ नुकसान झाले. हे प्रकरण आपापसात मिटवले असले तरी खाजगी वाहने स्टॅंडवर थांबवल्याने एस. टी. चालक व वाहक यांच्याबरोबर वादाचे प्रकारही होताना दिसून येत आहेत. आगार प्रमुखांनी यावर योग्य उपाययोजना आखून स्टँडला संरक्षक भिंत बांधून रिक्षा थांब्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *