वाघाची तालीम गोविंदा पथक मानाच्या दहीहंडीचे मानकरी

Loading

आजरा : प्रतिनिधी –

गोकुळ अष्टमी निमित्य आजऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमासह भव्य दहीहंडीचे आयोजन केले. हे सोळावे वर्ष असून बाळ केसरकर यांच्या या मानाच्या दहीहंडीचे मानकरी आजऱ्याची वाघाची तालीम गोविंदा पथक ठरले. 55 हजार 555 रुपये बक्षीस वाघाची तालीम मंडळाने पटकावले.

बाळ केसरकर हे स्थानिक गोविंदाना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी भव्य दहहंडी स्पर्धेचे आयोजन करतात. भव्य दिव्य अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच नेत्रदीपक प्रकाश झोतात हे कार्यक्रम पार पडले. यावर्षीही 16 व्या दही हंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. मानाच्या दहीहंडीचे अगदी नेटके नियोजन स्वराज्य तालीम मंडळाकडून करण्यात आले. या दहीहंडीला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. झरझर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगाला झोंबणारा गार वारा, नेत्रदीपक लाईट व्यवस्था आणि डी जे चा ठेका यामुळे एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली. डी जे च्या ठेक्यावर ताल धरित गोविंदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करीत आणि चारी बाजूनी तरुणाई थिरकत होती.

बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सर्वच बालकलाकारांना आयोजकाकडून गौरवण्यात आले. खास आकर्षण ठरले ते सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले नारूभाई, विषल्या आणि बालाजी. या रिलस्टार सोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली. काळजाचा ठोका चुकवणारे गोविंदांचे दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर, प्रत्येक क्षणाला वाढणारी उत्कंठा, अखेरीस वाघाची तालीम यांनी बाळ केसरकर यांच्या मानाची दहीहंडी फोडून 55,555 रु. चे मानकरी ठरले.

बाळ केसरकर यांच्या नेटक्या नियोजनाची चर्चा होत आहे.धो धो संततधार पावसातसुद्धा तरुणाईने आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य तालीमच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *