![]()
५ ऑगस्ट रोजी निवडणूक आयुक्त यांच्यासमोर सुनावणी

आजरा : हसन तकीलदार
तालुक्यातील जिल्हा परिषदेचा १ आणि पंचायत समितीचे २ गण कमी केल्याने सुनील शिंदे यांनी याबाबत हरकत दाखल केली असून त्याची सुनावणी व म्हणणे मांडण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी निवडणूक आयुक्त कार्यालय पुणे येथे सुनावणी होत आहे. त्यानुसार शिंदे यांनी कोणाकडे पुरावे तसेच अधिक माहिती असेल तर देण्यासाठी आवाहन केले आहे. तालुक्याला ३ आमदार असूनसुद्धा अनेक प्रश्नासाठी व अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते हे निश्चितच कमनशिबीपणाचे आहे. टोल पासून मतदार संघ वाचवण्यासाठी आज लढा द्यावा लागत आहे. हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याचेच हे वास्तव आहे. अगोदर तालुक्याचे ३ तुकडे केले आणि आता पंचायत आणि जिल्हापरिषदेचे गण कमी करून पुन्हा एकदा तालुक्यावर अन्याय केला आहे. हे गण अबाधित ठेवण्याकरिता सर्वपक्षीय आजरेकर लढा देत आहेत. ज्या प्रमाणात हरकती व लढा पाहिजे होता तितका नसल्याचे मत सुनील शिंदे यांनी मांडले. केवळ निवडणूकीसाठी रिंगणात उतरणाऱ्या उमेदवाराला लोकांनी स्थान देऊ नये असेही आवाहन त्यांनी केले.
तालुक्यातील काहींनी हरकती घेतल्या आहेत, तर काहीजण न्यायालयीन लढा देत आहेत. या सर्वांना सहकार्य करण्याच्या आवाहनाबरोबरच निवडणूक आयुक्त कार्यालय पुणे येथे आपले म्हणणे मांडण्यासाठी ज्यांच्याकडे काही पुरावे अथवा इतर अधिकृत माहिती असेल तर आपल्याला प्रत्यक्ष भेटून अथवा वॉट्सअप द्वारे देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिंदे आणि इतरांनी ज्या हरकती घेऊन तालुक्याच्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.