![]()
८५७ ग्रॅम गांज्यासह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंदगड : प्रतिनिधी
विक्रीसाठी आणलेल्या ८५७ ग्रॅम गांज्यासह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतला आणि याप्रकरणी बेळगाव-कंग्राळीसह तालुक्यातील चौघांवर गुन्हा दाखल केला. कार्तिक भरत चिखलकर (वय २८, रा. शाहूनगर, कंग्राळी-बेळगाव), प्रणय उदय जाधव (वय २३, रा. कोवाड), राहूल शिवाजी फडके (वय ३५, रा. माणगाव), शुभम प्रविण जाधव (वय २९, रा. लक्ष्मीनगर, चंदगड) अशी संशयितांची नावे आहेत.
शनिवारी (एमएच ४३ एएफ ९८४८) या क्रमांकाच्या कारमधून कार्तिक, प्रणव व राहूलने गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर यांनी सापळा लावला. हिंडगाव-चंदगड रोडवरील एका घरासमोर कारची झडती घेतली. त्यावेळी गांजा सापडला. तर चंदगड येथील सराईत गुन्हेगार शुभम याच्या घराचीही झडती पोलिसांनी घेतली, तेथेही गांजा आढळला.
या कारवाईत एकूण ८५७ ग्रॅम गांजा व कार असा एकूण ३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. आर. भिंगारदेवे करत आहेत.