![]()
आजरा / हसन तकीलदार
आजरा नगरपंचयतीच्या निवडणूक कालावधीची मुदत संपून गेली तरी निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अंदाजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये नगरपंचातीच्या निवडणूकीचे बिगुल वजणार हे नक्की झाले आहे.
यासाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरु होणार आहे. एकूण 17 प्रभागांची रचना असून 11 जून ते 16 जून 2025 या कालावधीत मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत प्रगणक गटाची मांडणी करणे, पुढील कार्यवाही म्हणजे मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत प्रारूप प्रभाग रचना करणे, यामध्ये अनुक्रमे 17 जून ते 18 जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, 19 ते 23 जून स्थळ पाहणी करणे, 24 ते 26 जून गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, 27 ते 30 जून नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जाऊन तपासणे आणि 1 ते 3 जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसूद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे. प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत पाठविणे (4जुलै ते 8जुलै ), त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, 15 जुलै ते 21 जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत हरकती अगर सूचना मागविणे, 22 जुलै ते 31 जुलै जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त हरकती अथवा सूचनावर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्या अखत्यारीत सुनावणी घेणे.
सुनावणीनंतर शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस पाठविणे. मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 पर्यंत राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्त अथवा मुख्याधिकारी यांना कळविणे. आणि 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 पर्यंत मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे. असा कार्यक्रम आहे.

