![]()
गणपतराव पाटील यांनी केली ‘कृत्रिम निचरा प्रणाली द्वारे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प, सेंद्रिय कर्ब वाढ’ या विषयावर मांडणी
शिरोळ/प्रतिनिधी:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जनकल्याणकारी समिती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती येथे आयोजित विदर्भ पाणी परिषदे मध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील (दादा) यांनी परिसंवादामध्ये सहभागी होऊन ‘कृत्रिम निचरा प्रणाली द्वारे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाय’ या विषयावर मांडणी केली. विलास चौथाई हे या परिसंवादाचे अध्यक्ष होते. विदर्भ पाणी परिषदेमध्ये श्री दत्तच्या क्षारपड सुधारणा प्रकल्पाची यशोगाथा सादर झाल्याने श्री दत्त पॅटर्नचे कौतुक होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिबसे यांनी यासंदर्भात पत्र पाठवून, या पाणी परिषदेमध्ये होणाऱ्या परिसंवादात श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या आणि सध्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाबाबत देश व जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आलेल्या क्षारपड सुधारणा प्रकल्पाची यशोगाथा आणि तांत्रिक माहिती देण्यासंदर्भात आमंत्रित केले होते.


त्यानुसार आज दिनांक ८ जून रोजी दुपारी १२.०० ते १.३० या वेळेत कृत्रिम निचरा प्रणाली द्वारे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प याविषयी गणपतराव पाटील व कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी क्षारपड सुधारण्याच्या संदर्भामध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती दिली. क्षारपड जमीन सुधारणेचा हा प्रकल्प देश व जागतिक पातळीवर राबविण्यात आल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता येईल, त्याचबरोबर देशाचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल हे अधोरेखित करण्यात आले. या परिसंवादामध्ये क्षारपड मुक्तीचा “श्री दत्त पॅटर्न” कामाचे कौतुक करण्यात आले. तसेच गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सांगली नदी पुनरुज्जीवन प्रकल्प या विषयावर विलास चौथाई यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. राज मदनकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश शुक्ला यांनी आभार मानले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी श्री गणपतराव पाटील यांचे व क्षारपड मुक्तीच्या कार्याचे विशेष कौतुक केले. समयजी बनसोड यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. विजय इलोरकर, किशोर पाटील आदी मान्यवरांसह दत्तचे ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील, इंजिनिअर कीर्तीवर्धन मरजे आदी उपस्थित होते.
