जयसिंगपूर शहरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

जयसिंगपूर शहरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

Loading

५० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

जयसिंगपूर / प्रतिनिधी

 येथील गल्ली नंबर पाचमधील राधाबाई रोड परिसरात राहणारे भगवान राजाराम बियाणी (वय ७६ ) यांचे घर २२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ५० लाख ७० हजार रुपये किमतीचे सोनं, हिरे आणि मोत्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला.

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले.दरम्यान, बियाणी यांच्या घरात काम करणाऱ्या संतोषबाई मदनलाल प्रजापत (वय ५४) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असता तीने सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कसून चौकशीनंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्यासोबत घरकाम करणारा विनायक मलगोंडा पाटील (वय ४१) याने देखील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. सदर दोघांनी संगणमत करून घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे गज इलेक्ट्रिक ग्रॅन्डर कटरच्या सहाय्याने कापून लाकडी कपाट उचकटून त्यातील ५० लाख ७० हजाराचे दागिने चोरले. त्यांच्या कबुलीनुसार चोरलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युनुस इनामदार करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, दीपक कदम, युनुस इनामदार, प्रवीण माने तसेच पोलिस अंमलदार ताहीर मुल्ला, निलेश मांजरे, वैभव सुर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी व महिला अंमलदार अंजना बन्ने, स्मिता कांबळे, राजश्री देसाई यांच्या पथकाने केली.जयसिंगपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *