![]()
गुन्हेगारीवर नियंत्रण; ‘गुरुदत्त शुगर्स’चे माधवराव घाटगे यांचे योगदान
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख आठ मार्गावर ॲटोमॅटिक नंबरप्लेट रेकगनायझिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विचाराधीन आहे. लोकसहभागातून होणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात सर्वप्रथम अंकली टोलनाक्याच्यावरून होत आहे. ‘श्री गुरुदत्त शुगर्स’चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या आर्थिक सहभागातून पोलिसांसाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प आठवड्याभरात साकारणार आहे.
गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची अद्ययावत नोंद गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मुख्य आठ मार्गांचे सर्वेक्षण करून हे मार्ग निश्चित करण्यात आले. यापैकीच एक असणारा कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा अंकली टोलनाका. या टोल नाक्यावरून दोन्ही जिल्ह्यात वाहतूक सुरू असते. बऱ्याचदा सांगली, मिरज भागातील गुन्हेगारांना गुन्हे करून अगदी आरामात पसार होण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने या मार्गावर अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्याचे निश्चित केले होते. मात्र लोकसहभागातून असलेला हा प्रकल्प दानशूर आणि अभावी रखडला होता. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची माहिती ' श्री गुरुदत्त शुगर्स'चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांना दिली. एका क्षणाचाही विलंब न करता श्री घाटगे यांनी प्रकल्पासाठी आर्थिक मदत जाहीर करून लागलीच रक्कम देऊ केली.
श्री घाटगे यांच्या मदतीने जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प अंकली टोल नाक्यावर अनुतीर्थ सोल्युशनच्या माध्यमातून साकारत आहे. सध्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात प्रकल्पाचे लोकार्पण होईल. या प्रकल्पामुळे गुन्हेगारीवर अंकुश बसणार असून वाहनांची अद्ययावत नोंद ठेवली जाणार आहे.
….
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- सीसीटीव्हीच्याही पुढील प्रकल्प.
- एका क्लिकवर दुचाकी, चार चाकीसह सर्व वाहनांची नोंद.
- वाहनाच्या रंगावरूनही गुन्हेगारापर्यंत पोहोचता येणार.
- एक महिन्यापर्यंतच्या अद्ययावत नोंदी राहणार.
- ८० स्पीडपर्यंतच्या वाहनांची मिळणार इत्यंभूत माहिती.
- वाहन चोरीसह सर्व गुन्ह्यांवर नियंत्रण.
……….
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारा ॲटोमॅटिक नंबरप्लेट रेकगनायझिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प महत्वपूर्ण आहे. गुन्ह्याचा तपास करणे सोयीचे तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासही प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. यासाठी गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून सहभाग घेतला याच्या समाधान आहे.
-माधवराव घाटगे
(अध्यक्ष व कार्यकारी संचालक, श्री गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी)

