![]()
आजरा प्रशासन आणि ठेकेदारात समन्वयाचा अभाव

आजरा / हसन तकीलदार
आजरा शहरात व उपनगरात मागील वर्षापासून कोट्यावधीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम मात्र नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे या कामात गती व सुसूत्रता नाही. नळ कनेक्शन धारकांची संख्या व घातलेल्या पाईपची साईज यात सुद्धा मेळ व नियोजन नाही. पाण्याचा दाबही कमी असून त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध नाही. नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष असून अशाच मुद्यांच्या आधारे आजरा अन्याय निवारण समितीने 16 जूनला उपोषणाचा इशारा दिला आहे. समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी अशी माहिती दिली.
ठराविक ठिकाणी अजूनही नवीन पाईप लाईन अर्धवट असून जुन्या कनेक्शनवरच पाणी पुरवठा सुरु आहे. आणि ज्या ठिकाणी नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे त्याठिकाणी पाण्याची गळती तपासण्याआधीच तसेच इतर चाचण्या घेण्याअगोदरच पाईप मुजवल्या आहेत. पुन्हा त्याठिकाणी गळती दिसून येत आहे आणि हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजऱ्यातील सोमवार पेठ येथे योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही, गोठण गल्ली येथे मागील तीन महिने पुरेसे पाणी मिळत नसल्याने स्वखर्चाने टँकर मागवून तेथील नागरिक पाणी घेत आहेत. याबाबत वारंवार लेखी तक्रार देऊन आंदोलनाचा इशाराही दिला होता.
प्रशासनाने योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि मोर्चा रद्द करण्याचे षडयंत्र केले असा आरोप समितीने केला आहे. आजसुद्धा याबाबत योग्य कार्यवाही झालेली नाही. तसेच ज्या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम झाले आहे तेथील रस्ते खराब झालेले आहेत त्याठिकाणी रस्त्याची कामे सुरु करीत आहेत परंतु ज्या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेची पाईप टाकून कनेक्शन देऊन योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे की नाही याची खात्री करूनच रस्त्याची कामे सुरु करावीत अशा सूचना करीत. जनतेचा पैसा वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. असे नमूद आहे. नगरपंचायतीचा विद्युत खर्च कमी व्हावा यादृष्टीने शासनाकडून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी निधी देण्यात आला, परंतु ही सोलर यंत्रणा अद्याप कार्यन्वयित नाही याचा खुलासा जनतेसमोर करावा. तेव्हा ही नवीन पाणी पुरवठा योजना केव्हा कार्यन्वयित होणार व ठेकेदारावर केलेल्या कारवाईची माहिती जनतेसमोर द्यावी असे या निवेदनात नमूद आहे. जर याची पूर्तता वेळेत झाली नाही तर 16 जूनला उपोषणाचा इशारा अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, जावेद पठाण, संतोष बांदिवडेकर, सुमेध वालावलकर, संजय जोशी, मिनिन डिसोझा, महादेव जाधव, मदन तानवडे, गणेश डोणकर, सुमन हरमळकर, लक्ष्मी नाईक, अब्दुलमजीद नेसरीकर, आलिया नेसरीकर यांनी दिला आहे.

