![]()
कु.सृष्टी मोकाशी सेमी इंग्रजी माध्यमात प्रथम
गडहिंग्लज / प्रतिनिधी
दहावी बोर्डाच्या परीक्षेत महागाव केंद्रात सेमी इंग्रजी माध्यमामध्ये तब्बल ९५.६० टक्के गुण संपादन करून कु. सृष्टी जोतिबा मोकाशी हिने बोर्डाच्या परीक्षेत लख्ख यश मिळवले. या यशाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. तर सेमी इंग्रजी माध्यमात कु. सृष्टी प्रथम आली आहे. जिद्द,चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश कसं मिळवावं याचा वस्तुपाठ सृष्टीने घालून दिला.

दुगुनवाडी येथून ९ किलोमिटरचे अंतर पार करत दररोज महागावच्या महात्मा फुले विद्यालयात शिक्षणासाठी जाणारी सृष्टी, घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची, पण ही स्थिती तिच्या शिक्षणाच्या आड आली नाही, दोन वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरपले पण आईच्या पाठबळावर व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सृष्टीने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. सृष्टीचे मूळगाव खणदाळ, दोन वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाले. ती आई शितल ,बहीण मनस्वी,आजी सोनाबाई चौगुले व लहान भाऊ विवान यांच्या सोबत आजीच्या गावी दुग्गुनवाडी येथे राहत आहे.आई मोलमजुरी करून कुटुंब सांभाळत,दोन्ही मुलींना जिद्दीने शिकवत आहे.दोन्ही मुली परिस्थितीची जाण ठेवून शिकत आहे.मोठी बहीण कोल्हापूर येथे शासकिय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनेक्शनमध्ये शिक्षण घेत असून तिच्या शिक्षणासाठी घरातील दागिने बँकेत ठेवून कर्ज घेतले आहे.याची जाणीव लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या सृष्टीला आहे.त्यामुळे तिने जिद्दीने व प्रामाणिकपणे अभ्यास करत,दुगुनवाडीतून ९ किलोमीटरच्या अंतर पार करत महागाव येथील महात्मा फुले विद्यालयात व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.एसएससी बोर्ड परीक्षेत ९५.६० गुण मिळवत महागाव केंद्रात सेमी इंग्रजी माध्यमात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले.तिच्या लख्ख यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी तिला प्राचार्य आय. एस. पाटील,संस्था प्रतिनिधी प्रा. डी.एस.पाटील, आण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक मोहन कांबळे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.सृष्टीला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.पुढील शिक्षणासाठी तिला मदतीची गरज आहे. त्यासाठी तिला सृष्टी जोतिबा मोकाशी बँक-बँक ऑफ बडोदा,शाखा- महागाव ,खाते क्र-९६६७०१०००२५०११, आयएफएसी-BARB0DBMGON या खाते क्रमांकावर मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.