शिरोळ तालुक्यातील ९५ कि.मी. च्या ग्रामीण रस्त्यांना ‘इतर जिल्हा मार्गाचा’ दर्जा

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना ‘इतर जिल्हा मार्ग’ म्हणून दर्जोनोती मिळाल्याने तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे संबंधित रस्त्यांच्या दर्जात बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार शिरोळ तालुक्यातील विविध ग्रामीण मार्गांचा ‘इतर जिल्हा मार्ग’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण आणि विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार असून वाहतुकीची सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे.
या ग्रामीण रस्त्यांसाठी अगोदर राज्य शासनाचा निधी मिळत नसल्याने रस्त्यांचा विकास होत नव्हता मात्र आता या ९ रस्त्यांना दर्जोन्नती मिळाल्याने राज्य शासनाचा थेट निधी या रस्त्यांना मिळणार असून शिरोळ तालुक्यातील रस्ते मजबूत होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना, शेतकरी, उद्योग व्यवसाय आणि नागरिकांना मोठा या रस्त्यांचा लाभ होणार आहे.
शिरोळ – घालवाड ते प्रमुख जिल्हा मार्गाला जोडणारा रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग ते हसूर बनवाडी कनवाड ते म्हैशाळ धरणाकडे जाणारा रस्ता, दत्तवाड पिरकुरण टाकळीवाडी ते हेरवाड श्री संतुबाई नदी पाणवठा रस्ता, राज्य मार्ग १४२ ते आगर – शिरोळ – घालवाड एमएससीबी शिरटी ते नृसिंहवाडी रस्ता, हेरवाड, लाटवाडी ते आयको सूतगिरणी रस्ता, टाकवडे इतर जिल्हा मार्ग ४४ ते इतर जिल्हा मार्ग ४३ दत्त सोयाबीन प्रकल्प ते हरोली प्रमुख जिल्हा मार्ग ३१ ला मिळणारा रस्ता, दत्तवाड हद्द दड्डी जुने दानवाड, नवे दानवाड, टाकळीवाडी, मजरेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग १०२ ला मिळणारा रस्ता, दानोळी धनवडे वसाहत, उमळवाड, उदगाव ते दत्त साखर कारखाना रस्ता एकूण ९५.१५ किलोमीटरच्या रस्त्यांना इतर जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला आहे.
या निर्णयामुळे पावसाळ्यात होणारी गैरसोय कमी होऊन ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुकर होणार आहे.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की, शिरोळ तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. या रस्त्यांना ‘इतर जिल्हा मार्ग’ दर्जा मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊन दर्जेदार रस्ते उभारता येतील. तसेच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जा मिळालेल्या या रस्त्यांपैकी काही रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) म्हणून दर्जा मिळावा यासाठी ही प्रयत्न करणार आहे जेणेकरून राज्य शासनाकडून या रस्त्यांना आणखी जास्त निधी आणण्यासाठी सोयीचे होईल.
दरम्यान येणऱ्या काळात या रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांना गती मिळून तालुक्याचा विकास अधिक वेगाने होईल.