कुरुंदवाड : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटन वारसा जतन करून त्याला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू असून दानवाड येथील ३०० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक घाट युवकांनी शोधून काढणे ही अभिमानास्पद बाब आहे. या घाटाच्या डागडुजीसाठी तातडीने १० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून, पुढील बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. रामनवमी निमित्त गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी या ऐतिहासिक घाट परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध पर्यटन स्थळे विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिरोळमध्ये येणारा पर्यटक दिवसभर येथेच थांबेल, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. दानवाड येथील घाट सुशोभीकरणामुळे या ठिकाणाला धार्मिक व पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
दानवाड येथील ऐतिहासिक राधाकृष्ण मंदिर, घाट व पायरी सुशोभीकरणासाठी आमदार यड्रावकर यांनी १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यामुळे गावातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यास मोठी चालना मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी दानवाड येथील युवकांनी जेसीबीच्या साहाय्याने सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा घाट व पायरी शोधून काढली होती. या कार्यामुळे परिसरात या वारशाबद्दल नव्याने जागरूकता निर्माण झाली आहे.
कृष्णा नदीपर्यंत प्रथमच आकर्षक लाईटिंग करण्यात आली होती. सकाळी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, भवानीसिंग घोरपडे, विजीतसिंह शिंदे, ज्ञानगंगा हायस्कूलचे चेअरमन शिवगोंड पाटील, गोटू तासगावे, मल्लिनाथ पाटील, अमोल बैरागी
संतोष धनगर, सचिन सांगलीकर, सुनील बेरड, संतोष बेरड, जितेंद्र बेरड, वर्धमान तिप्पनावर, संजय सावकार यांच्यासह ग्रामस्थ, भक्त मंडळी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दानवाड गावातील युवकांच्या पुढाकारामुळे हा ऐतिहासिक घाट पुन्हा प्रकाशझोतात आला असून, जाहीर झालेल्या निधीमुळे परिसराचे सुशोभीकरण होऊन पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
