![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी –
नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हुकूमशाही कारभार सुरू केला असून विरोधी नगरसेवकांना पूर्णपणे डावलले जात असल्याचा गंभीर आरोप शिरोळ तालुका विकास आघाडीचे नगरसेवक करीत आहेत. या अन्यायकारक व पक्षपाती कारभाराच्या निषेधार्थ शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या शूटिंगबॉल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा शुक्रवारी (ता. २०) रोजी पत्रकार परिषदेत विरोधकांनी केली. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर विरोधकांनी हे बहिष्काराचे हत्यार उपसले असून गेल्या अनेक वर्षात राज्यभरात आणि पुऱ्या देशात गाजत असलेल्या या शहरातील शूटिंग बॉल सामन्यांचा विषय आता राजकीय वळण घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे. तर “जनतेकडून कर वसूल केला जातो, मात्र नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिका ‘पैसे नाहीत’ असे सांगते. असे असताना नगरसेवकांना विश्वासात न घेता सत्ताधारी गटाला थेट पाच-पाच लाख रुपयांचा निधी स्पर्धेसाठी मंजूर केला जातो. हा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे.” असा घणाघाती आरोप नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर यांनी केला. नगरसेवक संतोष जाधव यांनी याच आरोपाला दुजोरा देत “आमचा विरोध कोणत्याही खेळाच्या स्पर्धेला किंवा विकासकामांना नाही; पण प्रशासनाला हाताशी धरून मनमानी निर्णय घेणाऱ्या हुकूमशाहीला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यायचे सोडून सत्ताधाऱ्यांनी पालिका म्हणजे खासगी मालमत्ता समजली असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर, ज्योतीराम जाधव, आदम मुजावर, सागर माने यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
केवळ दिखाऊ कार्यक्रमांसाठी कोट्यवधी निधीची उधळण : नगरसेवक गुरव आणि पवार यांचा दणका
केवळ दिखाऊपणा करत या पालिकेचे सत्ताधारी निव्वळ विकासकामांसाठी जनतेचा पैसा खर्च न करता कोट्यवधींची उधळण म्हणजे फक्त हुकूमशाही आहे असा दणका नगरसेवक पंकज गुरव व गंडाप्पा पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. तर “विरोधी नगरसेवकांचे प्रस्ताव पद्धतशीरपणे बाजूला सारले जात असून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना केवळ दिखाऊ कार्यक्रमांसाठी कोट्यवधींचा निधी उधळला जात आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले. “सत्ताधाऱ्यांनी ही मनमानी थांबवली नाही, तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
