पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या लक्षचंडी याग जयसिंगपुरात : उत्स्फूर्त प्रतिसाद

रविवारी ८० हजार भाविकांची उपस्थितीची शक्यता
जयसिंगपूर : प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच लक्षचंडी याग सुरु आहे. या लक्षचंडी याग चा दुसरा दिवस भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी १५१ हवनकुंडांवर याग संपन्न झाला असून तब्बल ३ हजार ६३३ स्वामीभक्तांनी या धार्मिक विधीत सहभाग नोंदविला. आज शनिवार, दि. २१ रोजी तिसरे व अंतिम हवन होणार असून, रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी श्री अन्नपूर्णा माता,श्री लक्ष्मीनारायण व श्री राधाकृष्ण मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सोहळा होईल अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली. या धार्मिक आणि भक्तिमय उपक्रमास शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात गेल्या दोन दिवसांपासून चंडी याग सुरू असून, कुलदेवीची उपासना, दुर्गासप्तशतीचे पठण तसेच दररोज दहा हजार हवनपाठ धार्मिक व भक्तीपूर्ण वातावरणात होत आहेत. या महायागासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक सीमाभागातील हजारो स्वामी भक्तांची उपस्थिती आहे. लक्षचंडी यागामुळे जयसिंगपूर परिसरात भक्तीमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी विविध संत-महंत, धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील तर या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सुमारे ८० हजार भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.