![]()
रहदारीला अडथळा : पालिका प्रशासन गांधारीच्या भूमिकेत
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील पालिका हद्दीतील यादवनगर परिसर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून, यामुळे येथील मुख्य रहदारीचा रस्ता पूर्णपणे अरुंद झाला आहे. नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना येजा करण्यात अडचण होत आहे.दैनंदिन वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या अतिक्रमणाबाबत सन २०१९ पासून तक्रारी होत असतानाही पालिका प्रशासन ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरले असून गांधारीच्या भूमिकेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अतिक्रमणामुळे या भागात घंटागाडी, रुग्णवाहिका तसेच आरोग्य सेवेशी संबंधित वाहने पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अस्वच्छता व गर्दीमुळे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
पालिकेकडे जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केला जात असल्याचे चित्र आहे. राजकीय दबावाखाली प्रशासन गांधारीची भूमिका घेत असल्याची चर्चा असून, तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

