![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थिनींसाठी विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर घेण्यात आलेल्या अंताक्षरी स्पर्धेत विद्यार्थिनींनी बहारदार गाण्यांच्या सादरीकरणातून सभागृहात आनंदी व जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केले.
दुपारच्या सत्रात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सी.ए. बी. टी. नाईक व मा. श्री. प्रितम देमापुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिंंनींंना भावी जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. डॉ. विकास मिणचेकर उपस्थित होते. त्यांनी पारितोषिकप्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सौ. श्रद्धा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलीमा खाडे यांनी केले, तर आभार प्रा. नवनाथ कुंभार यांनी मानले.
संध्याकाळी विद्यार्थिनींसाठी बहुप्रतीक्षित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. सांस्कृतिक विभागामार्फत स्नेहसंमेलनाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. योगेश बदामे, प्रा. पूनम बरगाले, प्रा. निलीमा खाडे व प्रा. पी. टी. माने यांनी केले.
या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, पालक, पत्रकार व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुंदर क्षणचित्रे छायाचित्रकार श्री. सुजल दिलीप कुपाडे यांनी टिपली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.