![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

“उंच उडावं, स्वप्न पाहावं, आकाश आपलं करून घ्यावं” या विचारांना साकार करत लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे आज मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुशीला दानचंद घोडावत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे चेअरमन मा. विनोदभाऊ घोडावत होते. यावेळी चकोते ग्रुपच्या मा. प्रज्ञा चकोते मॅडम तसेच महाविद्यालय विकास समिती व शाळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतानाप्रमुख मार्गदर्शक कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या संबोधनात विद्यार्थिनींना प्रेरणा देत सांगितले, “
पळून गेलेल्या मुली
कशा दिसतात
कशा हसतात
कशा बोलतात…
आईच्या डोळ्यात आसवं होऊन दाटतात…
या काळजाला भिडणाऱ्या ओळीप्रमाणेच प्रत्येक मुलीने स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यावी आणि आत्मविश्वासाने पुढे चालावे.” अशी प्रेरक कविता सादर करत त्यांनी सकारात्मक विचारांची प्रेरणा दिली.
कवी नितीन चंदनशिवे यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होण्याचे महत्त्व सांगितले. “अपयश हे शेवट नसून, ते यशाकडे जाण्याचं पहिलं पाऊल असतं” असे सांगत त्यांनी स्वतःचा संघर्षमय प्रवास विद्यार्थिनींसमोर उलगडला. शालेय शिक्षणात अपयशी ठरूनही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी होण्याचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. यावेळी त्यांनी आपल्या काही प्रसिद्ध कवितांचे सादरीकरणही केले. ‘तमाशा’ या कवितेला मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांच्या कवितेला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थिनीने स्वतःचे हक्काचे घर घ्यावे व स्वावलंबी बनावे असा मौलिक सल्लाही दिला.
अध्यक्षस्थानी उपस्थित मा. विनोदभाऊ घोडावत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबर कला, क्रीडा आणि विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सर्वत्र यश मिळवावे, अशी भावना व्यक्त केली आणि सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रो. डॉ. विकास मिणचेकर यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या वर्षभरातील यशस्वी शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली, तर प्रा. डॉ. पंडित वाघमारे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. वरिष्ठ विभागातील पारितोषिकांचे वाचन प्रा. स्वाती पाटील मॅडम यांनी तर कनिष्ठ विभागातील पारितोषिकांचे वाचन कुबेर पाटील यांनी केले.
या समारंभास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश बदामे, प्रा. अर्पिता चौगुले आणि प्रा. पद्मजा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार हल्लूर यांनी केले.