![]()
कुरुंदवाड : प्रतिनिधी
जवळपास नऊ वर्षांनंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पारंपरिक पॅनल व सत्तांतराच्या राजकारणाला बाजूला सारत नागरिकांनी राजर्षी शाहू विकास आघाडीवर विश्वास दाखवला. या विश्वासातून शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आली आहे. पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, स्वच्छता, नागरी सुविधा, शिक्षण, क्रीडा, रोजगार, उद्योगवाढ व पर्यटन विकास यावर भर देत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढू, विरोधकांनाही सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण, गतिमान विकास करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.कुरुंदवाड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारला, प्रसंगी नगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या सभेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, नूतन लोकप्रतिनिधींनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व लोकाभिमुख दृष्टीने काम करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी दिलेला विश्वास लक्षात घेऊन कोणताही पक्षीय भेद, गटबाजी बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीत उतरवून मूलभूत सुविधा पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण याबाबत ठोस निर्णय घ्यावेत. आपल्या प्रभागातील समस्या नियमितपणे जाणून घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा, तक्रारींचा वेळेत निपटारा करावा व प्रशासनावर योग्य पाठपुरावा करावा.तसेच महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांच्या गरजांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. विरोधक असले तरी शहराच्या हिताच्या निर्णयांना पाठिंबा देत एकत्रितपणे काम करणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. प्रामाणिक कार्यशैली, सेवाभाव आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम केल्यास नागरिकांचा विश्वास टिकून राहील आणि शहराचा शाश्वत विकास साधता येईल. यापुढे देखील शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल व शहराचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या प्रसंगी नगराध्यक्ष मनीषा डांगे म्हणाल्या, राजकीय जीवनात अनेक संकटांचा सामना मी निर्भयपणे केला आहे. डांगे कुटुंबाला जे काही मिळाले आहे, ते सहजासहजी मिळालेले नाही; संघर्ष, समाजसेवा आणि जनतेच्या विश्वासातूनच हे स्थान मिळाले आहे. आज डांगे परिवारात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि दहा नगरसेवक निवडून आले आहेत, हे केवळ समाजसेवेच्या जोरावरच शक्य झाले आहे. प्रचारादरम्यान नागरिकांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मी कधीही विसरणार नाही. काही अफवा आणि अडचणी असूनही जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, हे निकालातून स्पष्ट झाले.या विजयात शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा असून, राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. पुढील पाच वर्षांत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. जाहीरनाम्यात दिलेली प्रत्येक बाब केवळ आश्वासन न राहता प्रत्यक्षात पूर्ण केली जाईल, याची मी जबाबदारीने ग्वाही देते.
मी मोठी नेता म्हणून नाही, तर एक शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे काम करेन. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने निधी आणून कुरुंदवाड शहरात ठोस बदल घडवून आणू. जनतेने दाखवलेला विश्वास कधीही डळमळीत होऊ देणार नाही; शहराच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने सातत्याने काम करत राहणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी विजय जमदग्नी यांनी स्वागत केले.
मनोगत माजी सरपंच अभिजित जगदाळे, रामदास मधाळे, नगरसेवक वैभव उगळे, बाळासाहेब गायकवाड, रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांची मनोगते झाली.
याप्रसंगी रामचंद्र मोहिते, अजित देसाई, उमेश कर्नाळे, विठोबा कोळेकर, रणजित डांगे, लियाकत बागवान, अल्ताफ बागवान, सलिम बागवान, तोफिक आंबी, सिताराम भोसले, सचिन जोंग, तन्वीर मुल्ला यांच्यासह सर्व नूतन नगरसेवक नगरसेविका राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नूतन नगरसेवक रमेश भुजुगडे यांनी मानले.
