जामिनावर सुटलेल्या आरोपीचा चाकू हल्ला : दोघे जखमी

Loading

दारू दिली नसल्याचा राग : जयसिंगपूर पोलिसात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

 जयसिंगपूर : प्रतिनिधी

पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या चिपरी ता.शिरोळ हद्दीतील हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी नामक ढाब्यावर झालेल्या चाकू हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हल्लेखोर संशयित दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.यातील एक संशयितावर यापूर्वी सात गुन्हे दाखल असून तो खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता मात्र काही दिवसापूर्वीच त्याची जामिनावर कारागृहातुन सुटका झाल्याचे समजते.ही घटना गुरुवारी दि.१ जानेवारी रोजी पहाटे घडली असून राहुल किरण भबीरे व श्रीनिवास दुबगुंडी दोघे रा.कुरुंदवाड, ता. शिरोळ अशी संशयितांची नावे आहेत.आणि याबाबत सज्जन रमेश यादव, वय २४, व्यवसाय – वेटर, रा.बोरबाह, पोस्ट पाईपखरा यांनी फिर्याद दिली. वेटरसह मॅनेजर असे दोघेजण गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास संशयित आरोपी ढाब्याच्याकाऊंटर जवळ येऊन दारूची मागणी करू लागले.यावेळी ढाब्याचे मॅनेजर रविंद्र येवारे यांनी दारू व जेवणाचा साठा संपल्याचे सांगितले.याचा राग आल्याने राहुल भबीरे याने मॅनेजरच्या कानाखाली मारहाण केली.
दरम्यान,श्रीनिवास दुबगुंडी यानेही ‘जेवण व दारू का नाही?’असे म्हणत दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.त्यानंतर राहुल भबीरे याने कमरेला लावलेला चाकू काढून मॅनेजरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.हे थांबवण्यासाठी सज्जन यादव यांनी त्याला पकडले असता आरोपीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने यादव यांच्या डाव्या हाताच्या दंडावर,पाठीवर व छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. 

जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालयातून पोलिसांना वर्दी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.संशयितांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक उर्मिला खोत करीत आहेत.