प्रभाग १३ मधील अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गाडेकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन पाठिंबाचे पत्र दिले.
यावेळी बोलताना लता गाडेकर म्हणाल्या की, जयसिंगपूर शहरात मागील काही वर्षांत झालेला भक्कम आणि दूरदृष्टीपूर्ण विकास नागरिकांना दिसून येत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत सुरू असलेली विकासकामे अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आघाडीला जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
जयसिंगपूर नगरपालिकेत राजर्षी शाहू विकास आघाडीने निर्विवाद बहुमतासह सत्ता स्थापन केली असून शहराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारांनीही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेत असल्याने शहराच्या विकासाला बळ मिळणार आहे.

नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, अपक्ष उमेदवारांनी राजर्षी शाहू विकास आघाडीवर दाखवलेला विश्वास हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा नियोजित आणि शाश्वत विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. जयसिंगपूर शहरातील प्रत्येक प्रभागात यापुढेही मोठ्या ताकदीने विकासकामे राबवली जातील, असेही त्यांनी सांगितले. या पाठिंब्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून जयसिंगपूर शहराचा विकास यापुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, माजी नगराध्यक्ष शामराव बंडगर यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.