शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी शाहू आघाडीच हाच मजबूत पर्याय : मिलिंद भिडे

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहराची वाटचाल त्यांच्या विचारांच्या बळावर सुरू आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे शहराचा कायापालट झाला असून, हा विकास अखंडितपणे पुढे नेण्यासाठी शाहू आघाडीच पर्याय आहे, असा विश्वास भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला.
छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या प्रगतिशील विचारांच्या अधारे जयसिंगपूर शहराची उभारणी झाली असून, आजही त्या विचारांचा वारसा जोपासला जात आहे. गेल्या काही वर्षांत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना दिली आहे. 50 वर्षांपासून नागरिकांच्या प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम त्यांनी पूर्ण केले आहे. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शहरात आगमन करून सामाजिक सलोखा आणि समतेचा संदेश अधिक बळकट केला.
झोपडपट्टीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप ही एक महत्त्वाची समस्या होती. ही मागणी मार्गी लावून अनेक कुटुंबांना हक्काची कागदपत्रे देण्याचे काम आमदार यड्रावकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी रस्ते, सुविधा, शहरी सौंदर्यीकरण यांसारख्या अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली. त्यामुळे जयसिंगपूर शहर खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मिलिंद भिडे यांनी सांगितले.
राजर्षी शाहू विकास आघाडी हीच विकासपरंपरा पुढे नेण्यासाठीच नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना प्रत्येक प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेरीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना नागरिकांनी विकासाच्या प्रश्नांवर शाहू आघाडीवर दाखवलेला विश्वास वाढत असल्याचे भिडे यांनी नमूद केले.
जाती-पातीच्या पलिकडे समाजघटकांच्या हितासाठी विकासकामे करणारी शाहू आघाडी हा शहराच्या प्रगतीचा खरा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसमावेशक धोरण आणि प्रामाणिक कार्यामुळे आज प्रत्येक प्रभागातील मतदार शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
जयसिंगपूर शहराचा विकास आणखी वेगाने पुढे न्यायचा असेल, तर शाहू आघाडीचाच पर्याय नागरिकांसमोर ठामपणे उभा आहे. आगामी निवडणुकीत शाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजपाचे मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला.