![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्याचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले, जयसिंगपूर शहराचा विकास मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा देत आहे. आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासाचे नवे पर्व सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, राजर्षी शाहू विकास आघाडी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना विविध स्तरांतून मिळणारा पाठिंबा आमच्या विकासकार्यासाठी बळ देणारा आहे. सर्व पक्ष, संघटना आणि नागरिकांच्या एकजुटीतून जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य होईल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील, अमोल हिंगणगावे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, महासचिव गौतम कांबळे, जिल्हा संघटक विश्वास शिंगे, प्रशांत कांबळे, जीवन आवळे, अजित कांबळे, निखिल नंदीवाले, लखन उर्फ लक्ष्मण कांबळे, सर्जेराव धनवडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या जाहीर पाठिंब्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून शहरातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
