![]()
मतदारांच्या गाठीभेटींनी बदलले समीकरण
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रभाग 13 मध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून या प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे.शहरातील मागासवर्गीय प्रभागाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे आणि शिरोळ तालुका विकास आघाडीतून पंकज गुरव, अमित वाघवेकर, सतिश देवाळे आणि शिरोळ तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीचे दिवंगत लक्ष्मण सकटे यांचे चिरंजीव जॉन सकटे यांच्यात थेट लढत होत आहे.एकेकाळी एकत्र काम करणारे हे सर्व उमेदवार आज समोरासमोर विरोधात उभे ठाकले असून यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.प्रभाग 13 मध्ये यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार बनण्यामागे मिलिंद शिंदे (भाऊंनी ) आखलेली रणनिती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राजकारणातील मुरब्बी म्हणून ओळख असलेल्या भाऊंनी या प्रभागात प्रत्यक्ष गाटीभेटींचा धडाका लावला आहे.घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे.विविध प्रश्नांवर चर्चा करत आपल्या योजनांची माहिती देत त्यांनी मतदारांशी बांधिलकीचे नवे धागे विणले आहेत.त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, प्रभागातील रोजचे बदलते राजकीय समीकरण आणि मतदारांचा ओढा पाहता या प्रभागात अनिश्चिततेचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.सर्वच उमेदवारांकडे स्थानिक कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा असून त्यांनीही प्रचाराचीही गती वाढवली आहे.मात्र,भाऊंच्या प्रत्यक्ष संपर्क मोहिमेमुळे मतदारांमध्ये “भाऊ”आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका” असा सूर ऐकू येत आहे.सर्व उमेदवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या या निवडणुकीची सरशी कोण करणार,याबद्दल उत्सुकता वाढली आहे.जयसिंगपूर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष या महत्वाच्या प्रभागाकडे लागले असून येणारा निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल,यात शंका नाही.
