स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत ग्रामपंचायत हेरवाड मध्ये सांडपाणी व्यवस्थापनसाठी तब्बल 60 लाखांचा प्रोजेक्ट होणार : सरपंच सौ. रेखा जाधव

Loading

हेरवाड : प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन टप्पा:2, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत हेरवाडमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी भरीव निधी लागल्याने जल प्रदूषण रोखण्याकरता मोलाचा हातभार लागणार आहे. गावची लोकसंख्या मोठी असल्याने सांडपाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. सर्वच गावातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर आजवर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यातूनच आरोग्याच्या समस्या उद्भवल्या जातात. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील अनेक गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रोजेक्ट मंजूर झालेले आहेत. यामध्ये ग्रामपंचायत हेरवाडसाठी जवळपास 60 लाख रुपये निधीतून हा प्रोजेक्ट होणार आहे. महापूर क्षेत्रात महापूर येऊन गेल्यानंतर देखील हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या सुरू राहील या पद्धतीने या प्रोजेक्टचे डिझाईन झालेले असून विद्युतभाराचा अतिरिक्त खर्च ग्रामपंचायतींवर पडणार नाही या बाबींचा विचार करून या ठिकाणी सोलर प्लांट कार्यान्वित असणार आहेत. अगदी गावालगत पंचगंगा नदी असून देखील नदीतील दूषित पाण्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्यासाठी घोसरवाड येथून दूधगंगा नदीवरून पाणीपुरवठा योजना राबवावी लागली ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल. येत्या काळात शासनाने जल प्रदूषण रोखण्याकरता योग्य ती खबरदारी घेऊन ज्या ठिकाणचे दूषित पाणी, मैलायुक्त पाणी, रसायन युक्त मलमिश्रित पाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट नदीमध्ये सोडले जाते अशा ठिकाणी असे एसटीपी प्लांट बसवणे बंधनकारक करून शासकीय पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात असे मत हेरवाडगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेखा अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले.
सदरचा प्रोजेक्ट मंजूर करण्याकरिता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, हेरवाड गावचे उपसरपंच श्री संतोष चिंदरकर, ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी कोळेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी उप:अभियंता सुनील लोहार साहेब, गटविकास अधिकारी घोलप साहेब यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे.