शाहू आघाडीला संधी द्या शहराचा चेहरा मोहरा बदलेन – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

Loading

कुरुंदवाड मध्ये शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुरुंदवाड : प्रतिनिधी
जाती-धर्माच्या राजकारणाला मूठमाती देऊन कुरुंदवाड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राजर्षी शाहू विकास आघाडीला एकवेळ संधी देवून सर्व उमेदवारांना विजयी करा’ येत्या काळात कुरुंदवाडचा कायापालट करेन, असा ठाम विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
कुर्डूवाडी येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
येथील गणपती मंदिरामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी तसेच समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
याप्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, गटतट आणि जातीपातीच्या राजकारणामुळे शिरोळ आणि जयसिंगपूर शहराप्रमाणे कुरुंदवाड शहराचा विकास झालेला नाही. या सर्व जातीपातीच्या भिंतीत पाडून आम्ही राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुरुंदवाड शहरातील जनतेने राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना एक वेळ संधी देऊन पहा येत्या काळात शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना, प्रस्तावित भुयारी गटारी योजना, शहरातील रस्ते यासह विविध विकास कामांचा आलेख घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे. शहरातील रस्ते अरुंद आहेत त्यामुळे ड्रेनेज सिस्टीम राबवून शहरातील रस्ते रुंदीकरण करण्याचा आमचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आहे.
गेल्या ४० वर्षापासून कुरुंदवाड शहराचा विकास रखडला आहे. शहरात गटातटाचं राजकारण आहे, ते राजकारण बाजूला करून विकासाचं राजकारण आणि समाजकारण आम्ही करणार आहे. जातीपातीच्या राजकारणाला मूठमती देऊन आम्ही काम करणार आहे. कुरुंदवाड शहराला विकासात्मक चेहरा देण्याची गरज आहे, त्यामुळे उच्चशिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांच्या माध्यमातून कुरुंदवाड शहराचा कायापालट करू, कुरुंदवाड जनतेने फक्त पाच वर्षे आमच्याकडे सत्ता देऊन पहावे कुरुंदवाड शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे म्हणाल्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून कुरुंदवाड शहराची निवडणूक लढवीत आहे, कुरुंदवाड शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही निवडणूकीला सामोरे जात आहोत, त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्या, असे त्यांनी सांगितले.
या पदयात्रेला माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेनेचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, शिवसेनेचे जिल्हा संघटक वैभव उगळे, माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील, जय कडाळे, लियाकत बागवान, अनुप मधाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.