२५ वर्षाची प्रलंबित मागणी संघटित प्रयत्नामुळे यशाच्या वाटेवर : शिरोळ प्रशासनाने दिली रस्ता रुंदीकरणाची ग्वाही

Loading

:कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी रस्ता ३० फूट करणार: वेळेत काम न केल्यास तीव्र अंदोलन छेडणार : दिगंबर सकट यांचा इशारा

शिरोळ : प्रतिनिधी –

तहसील कचेरी ते दत्त कारखाना हा रस्ता दोन्ही बाजूच्या भरावांसह दुरुस्त करावा या मागणीसाठी समता नगरसह परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर शिरोळ नगरपालिका प्रशासनाला खडबडून जाग तर आलीच असून तहसील कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी पर्यंतचा रस्ता ३० फूट रुंदीकरणासह दुरुस्त करण्याची ग्वाही पालिका प्रशासनाने दिल्याची माहिती समता नगर जनहित मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर सकट यांनी एका पत्रकाद्वारे दिली. गेली अनेक वर्षांची ही प्रलंबित मागणी केवळ संघटित प्रयत्नांमुळे यशदायी ठरणार असल्याचा आत्मविश्वास सकट यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिगंबर सकट यांनी दिला आहे.

गेली अनेक वर्षे या हा रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत असून सामान्य नागरिकांना चालत जाणे कमालीचे मुश्किल बनले आहे. या कामी समता नगर जनहित मंडळांने पुढाकार घेतला आणि समता नगर, साईनगर, बेघर वसाहत, इंदिरानगर, रमाबाई नगर या भागातील नागरिकांच्या निवेदनासह आंदोलन उभारण्याचा इशारा वेळोवेळी दिला. दि. १० ऑक्टोबर २५ रोजी शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेती आणि आंदोलनाची नोटीस दिली. याबाबत नगरपालिका प्रशासनाने शिष्टमंडळातील दिगंबर सकट, अशोक कांबळे, दिनकर मोरे-भाट, रियाज मोमीन टेलर, सहदेव कांबळे, भाऊसो कदम गुरुजी, आनंद सकट, सचेतन बनसोडे, सौरभ घाडगे, जालंदर वराळे, सलाउद्दीन तहसीलदार, समीर मताबे आदींशी चर्चा केली. आणि या रस्त्याबाबत सविस्तर माहिती दिली. हा रस्ता नगरपालिकेने ताब्यात घेतल्याचे सांगितले. तर आचारसंहिता संपताच तहसीलदार कचेरी ते बेंद्रे दूध डेरी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर अतिक्रमण निर्मूलनासह ३० फूट रुंद करण्यात येईल असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले.