![]()
आजऱ्याच्या दोन्ही नामदारांची भूमिका गुलदस्त्यात! : कार्यकर्त्यांची तडफड

आजरा : हसन तकीलदार –
नगरपंचायतीची निवडणूक जवळ आलीच आहे, तशी भावी नगरसेवकांची भाऊगर्दी वाढत असून सोशल मीडियावर इच्छुकांचा फाजील आत्मविश्वास व्हायरल होताना दिसत आहे. तर दोन्ही नामदारांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यातच असल्याने कार्यकर्त्यांची मात्र तडफड दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रत्येक इच्छुक आपल्या वॉर्डात ‘मी’ च अशा आशयाची स्टेट्स आणि वॉट्सअपला प्रचार करताना व्यस्त आहेत. तर आघाडीमध्ये आपले स्थान पक्के होण्यासाठी त्यांची धडपडही दिसत आहे. परंतु तालुक्याला लाभलेल्या दोन्ही नामदारांनी मात्र अजूनही मौन पाळले असून साहेबांनी अमुक यांच्या पाठीशी राहण्यासाठी सांगितले आहे, अमुक गटाशी युती करणार असून अशा अफवांना मात्र उधाण आले आहे. यात दोन्ही आघाड्यानी सावधगिरी बाळगली असून उमेदवार निवडीसाठी चाचपणी सुरु आहे. जवळ जवळ चार नावे आघाडीवर असताना त्यातील आता दोन नावे पुढे आल्याची चर्चा सुरु आहे. त्यातून वरील बाबींचा ज्यामध्ये स्पर्श आहे अशा उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल असा अंदाज आहे.
या अगोदर आमच्या चॅनेलने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे विरोधी आघाडीत घडामोडी सुरु आहेत. तर गेल्या विधानसभेला नाम. आबिटकर यांना ज्या मुस्लिम मावळ्यांनी मोलाची साथ दिली आता त्या मुस्लिम मावळ्यांना वरून काय आदेश होणार याचाही परिणाम नगरपंचायत निवडणुकीत दिसून येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी कोणाला मदत करणार हे महत्वाचे ठरणार असून ही निवडणूक अटीतटीची होईल. किती उमेदवार रिंगणात उतरणार आहेत याचेही अजून चित्र अस्पष्ट आहे.