![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे साहील रफिक मुल्लाणी (वय 26, रा. उदगाव ता.शिरोळ), ओंकार बाबुराव तोवार (रा. इचलकरंजी, सध्या दानोळी) आणि रमेश संतराम पाटील (वय 29, रा. जुना चंदूर रोड, इचलकरंजी ) अशी आहेत.पोलिसांनी उदगाव येथील गट नं.145 मधील गोट्यात आणि इचलकरंजी येथील बरगे मळा परिसरात छापा टाकून 100 रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा (एकूण 684) तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर, प्लॅस्टिक स्केल, कटर, कागद इत्यादी साहित्य जप्त केले.या कारवाईत 68,400 रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि 19,600 रुपयांचे साहित्य असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत आहेत.