![]()
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि संग्रहालय “शिवतीर्थ” उभारण्यात आले असून, या ऐतिहासिक स्मारकाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दिनांक ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. सांगली-कोल्हापूर रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील या भव्य स्मारकाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
या भव्य सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगरविकास राज्यमंत्री व सह-पालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, तसेच राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, लोकसभा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मान्यवर, आमदार या ऐतिहासिक क्षणी उपस्थित राहणार आहेत.
जयसिंगपूर शहरात गेल्या ४० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा व्हावा ही शिवभक्तांची मोठी इच्छा होती. हीच लोकांची भावना ओळखून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न करत राज्य शासनाकडून विनामूल्य जागा उपलब्ध करून घेतली आणि या जागेवर अत्याधुनिक शिवस्मारक, संग्रहालय व अभ्यासिका उभारण्यात आली आहे.
शिवतीर्थच्या लोकार्पणामुळे जयसिंगपूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तसेच शिरोळ तालुक्यातील तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करणेत आले आहे.

