16 ला शेतकरी संघटनेची 24 वी ऐतिहासिक ऊस परिषद

Loading

काटा मारी, रिकव्हरी चोरी, तोडणी-वाहतूक खर्च यावर सरकारला घेरणार

जयसिंगपूर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येत्या १६ ऑक्टोबर रोजी विक्रमसिंह क्रीडांगण, जयसिंगपूर येथे ऐतिहासिक २४ वी ऊस परिषद पार पडणार आहे. या परिषदेत यावर्षीच्या ऊसाच्या पहिल्या उचलीचा दर किती असावा तसेच आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, हे ठरणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या २४ वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाचा एल्गार पुकारत आली आहे. या परिषदेत होणाऱ्या दर निश्चितीनंतर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत सुरू होतो. यंदा सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उत्तर कर्नाटक सीमाभागातील गावागावांत ऊस परिषदेची जोरदार तयारी सुरू आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून विविध भागांमध्ये शेतकरी मेळावे, पदाधिकारी बैठका आणि प्रसार माध्यमांतून प्रचार करण्यात आला आहे. मोरे यांनी सांगितले की, “काटा मारी, रिकव्हरी चोरी, तोडणी-वाहतूक खर्च आणि उपपदार्थातून साखर कारखानदार शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या पाच वर्षांत एफ.आर.पी. मध्ये तब्बल ₹६५० ची वाढ झाली असली तरी ऊस दर मात्र ₹३००० ते ₹३२०० या मर्यादेतच स्थिर आहे. खतं, बियाणे, कीटकनाशके आणि मजुरीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे.

राज्य सरकार आणि साखर संघाने एफ.आर.पी. च्या एकरकमी देयकावर मोडतोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ ₹२५०० तर मराठवाडा–विदर्भातील शेतकऱ्यांना ₹२००० ते ₹२२०० एवढीच पहिली उचल मिळणार आहे, ज्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा फटका बसणार असल्याचे मोरे यांनी नमूद केले.

या सर्व पार्श्वभूमीवर यंदाची ऊस परिषद जोरदार आणि ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अजित पोवार, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, आण्णासो चौगुले, रामचंद्र फुलारे, सुभाष शेट्टी, सचिन शिंदे, तानाजी वठारे, बंडू चौगुले, शंकर नाळे, बंडू पाटील, विक्रम पाटील, नितेश कोगनोळे, कुमार सुतार, श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *