![]()
लढणे समजून घेतले तर आकाशही ठेंगणे : धडधाकट युवकांना जिद्दीचा धडा

आजरा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका लहानशा गवसे या खेड्यातील विशाल शिवाजी नवार याने आपल्या अंधत्वावर मात केली असून आय. बी.पी. एस.परीक्षा उत्तीर्ण झाला तर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक पदावर झेप घेतली आहे. या यशामुळे धडधाकट युवकांना जिद्दीचा धडा विशाल नावार यांनी दिला. आपल्या कमजोरीवर मात करीत शासकीय बँकेत धडक मारणे हे सोपे नव्हते, तरीसुद्धा यशाला गवसणी घालून आजच्या युवकांना जिद्दीचा आणि यशाचा मार्ग दाखवला. फक्त जिद्द ठेवा, आयुष्याची सुरवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते. मन ध्येयवेडे असेल तर अंगात बळही येते. जिद्दीच्या जोरावरच तर यश सदैव हसू लागते. लढणे समजून घेतले तर आकाशही ठेंगणे होते, नेमकं हेच गवसे येथील विशाल नवारने दाखवून दिले.
विशाल हा पूर्वीपासून अंध नव्हता फक्त रातांधळेपण होता. परंतु काही दिवसांनी त्याला दिसणे बंद झाले. अगदी मनमिळावू आणि आज्ञाधारक व्यक्ती, घरची परिस्थिती बेताचीच आहे. जमीन, शेतीवाडी नाही. गावात फक्त दीड दोन गुंठे जागा आहे. वडील वारणानगर येथे हॉटेलमध्ये काम करतात. विशाल याची शिकण्याची इच्छा मात्र तीव्र होती. त्याचे शिक्षण कोल्हापूर येथे प्राथमिक आणि माध्यमिक अंधशाळेत झाले. डोळ्यांची व्याधी असताना सुद्धा त्याच्या तीव्र इच्छेला कुटुंबातील सदस्यांनी कधीच विरोध केला नाही. ते त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. अशा परिस्थितीत सुद्धा विशालला मुंबई सारख्या शहरात शिकवले. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश संपादन केले.
महत्वाची आणि अभिमानाची बाब म्हणजे विशालची नेमणूक गवसे येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतच झाली आहे. मुंबईच्या दादर येथील कीर्ती कॉलेज मधून विशालने पदवी संपादन केली. आई मोल मजुरी करते, तर एक भाऊ खाजगी कंपनीत नोकरी करतो. याबद्दल आमच्या गावचा तरुण म्हणून विशाल बद्दल अभिमान आहे असे हॉटेल घरचा दरबारचे मालक युवा उद्योजक अविनाश हेब्बाळकर म्हणाले. या निमित्ताने “रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवां बदलता है” या ओळी सुचतात.