![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

दहीहंडी उत्सव समितीने जयसिंगपूर शहरात दहीहंडी उत्सव कार्यक्रम घेऊन युवा वर्गात समोर एक मोठा आदर्श घालून दिला आहे असे गौरवोद्गार मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला. अगदी कमी कालावधीमध्ये असा दहीहंडी उत्सव घेऊन यावर्षीपासून या समितीने शहरवासीयांसाठी पंचक्रोशीतील दहीहंडीच्या खेळाडूंना नवा पांयडा घालून दिला असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी देखील शहरामध्ये स्पर्धा व्हायच्या मात्र ही मोठी स्पर्धा या शहरांमध्ये कधी झाली नव्हती. दहीहंडी खेळाबरोबर महिला वर्गाला तसेच युवा वर्गास आनंद लुटण्यासाठी कॉमेडी, डान्स शो, मनोरंजन असे कार्यक्रम तसेच डीजे लाईट शोचे आयोजन केल्याने आज हे मैदान भरून गेल्याचे ते म्हणाले. शहरातील नागरिकांना दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी शिरोळ, सांगली, कोल्हापूर, मिरज अशा ठिकाणी जावे लागत होते. मात्र दहीहंडी उत्सव समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी स्पर्धा ठेवून शहरातील नागरिकांसाठी रसिक प्रेक्षकांसाठी एक मोठे योगदान दिले आहे. या दहीहंडी उत्सव समितीला शुभेच्छा दिल्या. याहीपेक्षा मोठ्या पद्धतीने स्पर्धा भरवाव्यात असे बोलून त्यांनी दहीहंडी उत्सव समितीचे त्यांनी कौतुक केले.
दरम्यान या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा बंदोबस्त होता. खेळाडूच्या सुरक्षितेसाठी रुग्णवाहिका देखील तैनात होती. त्याचबरोबर कमांडो फोर्स, रेस्क्यू फोर्स यांचीही पथक तैनात होते. येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी तसेच कलाकारांचे स्वागत करण्यासाठी हलगीच्या वाद्यावर ठेका होता. स्पर्धेच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पार्किंगची व्यवस्था उत्तमरीत्या होती. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत वेळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला.
जयसिंगपूर दहीहंडी उत्सव समितीचे तसेच एस.जे ग्रुप जयसिंगपूर सर्व पदाधिकाऱ्यांनी नेटके नियोजन केले. यावेळी शहर परिसरातील नागरिक यांच्यासह आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
