![]()
दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना तर्फे पांडुरंग मंदिर येथे शेतकरी मेळावा संपन्न
हुपरी : प्रतिनिधी
रांगोळी ता. हातकणंगले येथे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने पांडुरंग मंदिर येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. या अंतर्गत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, माती, पाणी, पाने परीक्षण, उत्तम बियाणांचा वापर, योग्य खत आदींबाबत चर्चा करण्यात आली. अशी योग्य मात्रा दिल्यास अधिक ऊस उत्पादन घेता येते आणि शेतातील पाचट न जाळता कुट्टी करून सरी मध्ये भरल्यास धेंच्या, ताग अशा हिरवळीच्या पिक शेण खताचे वापर करून सेंद्रिय स्तर वाढवणे, पाण्याचा निचरा करणे, या पंचसूत्रीचा वापर केल्यास भरघोस उसउत्पन्न मिळेल असे प्रतिपादन प्रमुख वक्ते शांतीनाथ पाटील शास्त्रज्ञ ,एस व्ही ऍग्रो सोल्युशन पुणे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रदीप देसाई हे होते.
या प्रसंगी दत्त सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन आणि दत्तउद्योग समूह प्रमुख गणपतराव पाटील यांनी उत्पादन करणाऱ्या जमीनीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. अन्न उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. उपलब्ध जमीन क्षारपड मुक्त केल्यास ती पुन्हा वापरता येऊ शकते आणि त्यासाठी सुपर केन नर्सरी, सेंद्रिय कर्ब वाढ, गांडूळखत आळवणी, फवारणी, जिवाणू वाढ, स्पर्धात्मक पीक संघर्ष अशा कारखान्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रारंभी सहकार महर्षी डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दत्त सहकारी साखर कारखाना चेअरमन रघुनाथ काका पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, रांगोळी विकास सेवा सोसायटी चेअरमन दादासो पाटील, व्हाईस चेअरमन बंडोपंत सादळे, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मलकारी तेरदाळे, मौजे सांगाव चे उपसरपंच कृष्णात पाटील, अप्पासो देसाई, राजू माळी, प्रमुख कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे यांनी केले. सूत्र संचालन प्रेमचंद पाटील यांनी केले तर आभार प्रवीण शेट्टी यांनी मानले.

