![]()
आजरा तालुक्यातील आरदाळ गावकऱ्यांचा प्रश्न
आजरा : राजाराम कांबळे

आजरा तालुक्यातील आरदाळ येथील ८० वर्षाचे वृद्ध गंगाराम कांबळे यांना घर देता का घर अशी म्हणायची वेळ आली असून कोणतेही जवळचे नातेवाईक नसल्यामुळे ते एका पडक्या घरात रहात आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी मर्यादा आणि अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून या वृद्धाची मदत करावी असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे चालू पावसाळ्यात त्यांच्या घराची पडझड झाली असून ग्रामसेवक पाहणी करून गेले आहेत. मात्र प्रशासनाने त्यांची कोणतीच व्यवस्था केलेली नाही. राहते घर पडण्याच्या अवस्थेत आहे. आरदाळ गावचे सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते डॉ. महादेव ढोकर -पाटील, सुहास पाटील, बयाजी ससाणे यांच्यासह काही कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांना मर्यादा येत आहेत. गंगाराम कांबळे यांचे घर कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहे. त्यांचे जवळचे नातेवाईक कोणीही नाहीत. त्यांची पत्नी मरण पावली असल्याने घरी ते एकटेच राहतात. वयोमानानुसार आता त्यांना पूर्वीसारखी मजुरीची कामे होत नाहीत. गळक्या, ओल्या घरात ते एकटेच राहतात.
छप्पर पडण्याच्या स्थितीत आहे. दुरून हळहळणे सुरु आहे. परंतु जवळ जाऊन मायेची फुंकर घालणारे कोणीच नाही. गंगाराम कांबळे यांना सद्या आसऱ्याची गरज आहे. वादळी पाऊस जोरात सुरु आहे. वादळ वाऱ्यामुळे त्यांचे घर केंव्हाही पडू शकते. किमान प्रशासनाने तरी यामध्ये लक्ष घालून त्यांच्या राहण्याची तजवीज करणे क्रमप्राप्त असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे असे दिसते. घर कोसळून त्यांचे काही बरे वाईट झालेस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा कॉ. शिवाजी गुरव यांनी दिला आहे.