जयसिंगपूर नगरपालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रम व मैफिलीतून महिला सक्षमीकरणाचा संदेश

जयसिंगपूर : प्रतिनिधी
महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत जयसिंगपूर नगरपरिषदेतर्फे आयोजित महिला दिन विशेष कार्यक्रम दोन दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाले. आरोग्य, संस्कृती आणि महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दि. २४ मार्च रोजी दुपारी २ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. नलिनी सुभाष पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, तर मा. स्वरूपा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते बचत गटांच्या स्टॉल्सचे उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, त्रिशला संजय पाटील यड्रावकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वेशभूषा स्पर्धा व सामूहिक नृत्य स्पर्धा या उपक्रमांनी महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती सौ. स्वाती सागर मादनाईक यांनी केले. माजी नगराध्यक्षा सौ. स्वरूपाताई पाटील-यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त करत महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. मुख्याधिकारी यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले. कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्या सौ. सानिका पाटील-यड्रावकर यांनी महिलांना प्रेरणादायी संदेश दिला. सूत्रसंचालन सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. रुपाली बंडगर यांनी केले.

दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुप्रसिद्ध गायक डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या भावगीतांच्या सुरेल मैफिलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

स्पर्धांमध्ये पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत दिपाली बाबर यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर सामूहिक नृत्य स्पर्धेत JPMC ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा सौ. अनुराधा राजेंद्र आडके, महिला व बालकल्याण सभापती सौ. स्वाती सागर मादनाईक, उपसभापती सौ. रुपाली राहुल बंडगर, समिती सदस्या सौ. मीनल रोहित नांद्रेकर, सौ. सुमैय्या सुलेमान कडबी, सौ. उज्ज्वला उत्तम वाघवेकर, सौ. तेजश्री राहुल पाटील-यड्रावकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. तसेच उपमुख्याधिकारी सौ. प्रमिला माने, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सौ. श्वेता पवार, उपनगर अभियंता सौ. राधिका हावळ-शिंगाडे, समुदाय संघटक सौ. मेघा खामकर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिला बचत गट सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहल कुलकर्णी व श्री. बबन यादव यांनी केले. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना प्रेरणा देणारे असे उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.