जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती या महाविद्यालयाला “DYPUSOP Best APTI–Maharashtra Activities Conducting College of the Year Award – 2026” हा मानाचा राज्यतरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आयोजित “महाएप्टिकॉन २०२६” ही राज्यस्तरीय परिषद सातारा येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेत राज्यभरातील फार्मसी क्षेत्रातील प्राचार्य,शिक्षक, संशोधक आणि औषध उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परिषदेत फार्मसी शिक्षणातील बदलते प्रवाह, आधुनिक अध्यापन पद्धती, नवतंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योग-शिक्षण सहकार्य या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.महाविद्यालयाला मिळालेला हा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमुळे शक्य झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा सन्मान प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय जे.मगदूम आणि उपाध्यक्ष व सेक्रेटरी ॲड.डॉ. सोनाली मगदूम यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.सचिन निटवे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ट्रस्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ.सुनिल आडमुठे तसेच प्राचार्य डॉ.प्रमोद बुद्रुक,डॉ. अनिल मडके उपस्थित होते.
