![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
कुटवाड (ता. शिरोळ) येथे राजकीय वातावरण तापले असून गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केल्याने आघाडीची ताकद वाढली आहे. कुटवाड येथील अमोल अनिल पाटील, अमर पाटील, अनिल महात्मे, दीपक पाटील, प्रथमेश पाटील, राजकुमार पाटील व धनाजी पाटील यांनी आज आपल्या समर्थकांसह राजर्षी शाहू विकास आघाडीत अधिकृत प्रवेश केला.
या प्रवेशप्रसंगी त्यांनी उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार अमोल चव्हाण तसेच अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सौ. सीमा म्हैशाळे यांना जाहीर पाठिंबा दिला. विकासाभिमुख नेतृत्व आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारी भूमिका पाहता आपण राजर्षी शाहू विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, शेतकरी व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांची भूमिका ठोस व विश्वासार्ह आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अमोल चव्हाण व सीमा म्हैशाळे यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत राजर्षी शाहू विकास आघाडी ही विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभारासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या जाहीर प्रवेशामुळे कुटवाड परिसरात राजर्षी शाहू विकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
