झेडपीचा बिगुल वाजला : राजकीय हालचाली सुरु

Loading

गडहिंग्लज : राजाराम कांबळे

जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आणि राजकीय हालचालींचा वेग वाढत आहे. वेळ कमी असल्याने नेते व कार्यकर्त्यांत उत्साह दिसत असून काहीजणांची नाराजीही दिसत आहे. तर महागाव–भडगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रमुख नेते व प्रबळ दावेदार श्री. अमरसिंह चव्हाण यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या बैठकीला मोठी गर्दी उसळली. बैठकीस मतदारसंघातील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघात अनेक वर्षांत केलेले भरीव काम, तसेच पंचायत समिती सभापती असताना घेतलेले लोकहिताचे निर्णय याची उपस्थितांनी विशेष दखल घेतली. प्रशासन व अधिकाऱ्यांशी समन्वय साधत गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणारे नेतृत्व म्हणून अमरसिंह चव्हाण यांची ओळख आहे.तरुणांपासून ज्येष्ठपर्यंत, संजय गांधी निराधार योजना असो किंवा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या, आरोग्यविषयक आपत्कालीन वैद्यकीय मदत असो किंवा सामाजिक वाद-विवाद — प्रत्येक प्रश्नावर एकमेव उत्तर म्हणजे अमरदादा असे समीकरण या मतदारसंघात तयार झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्यासारख्या अनुभवी आणि लोकाभिमुख नेत्याला बळ देऊन, आदर्श जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे त्यांनी सभापतीपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामातून आधीच दाखवून दिले आहे. यावेळी अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून अमरसिंह चव्हाण यांनी जनतेसाठी केलेल्या कार्याची उजळणी करत, असे सक्षम नेतृत्व मतदारसंघासाठी का आवश्यक आहे याची ठाम भूमिका मांडली. या प्रसंगी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पट्टनकोडी सर यांनी केले. तसेच उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अमर चव्हाण यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.