यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासाची गती कायम राहील : नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर

Loading

जयसिंगपूर नगरपालिकेत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

जयसिंगपूर :
२०१९ नंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असून ही विकासाची गती पुढील काळातही कायम राहील, छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जयसिंगपूर शहराची आखीव-रेखीव ओळख कायम ठेवण्यावर भर देण्यात येणार असून शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांना येत्या काळात प्रॉपर्टी कार्ड देणे तसेच त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे, निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दानुसार शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना येत्या ९ तारखेपासून सुरुवात होणार आहे पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने भ्रष्टाचारमुक्त, लोकाभिमुख प्रशासन देत जयसिंगपूरचा आदर्श शहर म्हणून विकास केला जाईल, असा विश्वास नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
जयसिंगपूर येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी जयसिंगपूर चे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन हलगीचा कडकडाट फटाक्यांची आतषबाजी फुलांची उधळण करीत नूतन पदाधिकाऱ्यांचे नगरपालिकेत स्वागत करण्यात आले.
येथील सिद्धेश्वर हॉलमध्ये प्रारंभी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले,
शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासावर विशेष भर देणार असून जयसिंगपूरकरांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले.
नगरपालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी एकत्रित मॉडेल व डिजिटल शाळा उभारण्याचा मानस व्यक्त करत, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा, संगणक, डिजिटल साहित्य व इंग्रजीचे मूलभूत शिक्षण देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सामान्य व गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आरोग्य क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या मोठ्या क्षमतेच्या रुग्णालयामुळे जयसिंगपूर शहरासह परिसरातील ग्रामीण भागाला लाभ होणार असून, यामुळे रोजगारनिर्मिती, व्यावसायिक संधी व शहराच्या अर्थकारणाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी प्रशिक्षण योजना, स्वयंरोजगार उपक्रम व स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. शहराच्या विकासात पक्षभेद विसरून सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले,
जवळपास नऊ वर्षांनंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीने सर्व २१ जागांवर विजय मिळवत जनतेचा भक्कम विश्वास संपादन केला. नगराध्यक्षांना राज्यात नवव्या क्रमांकाचे मताधिक्य मिळाल्याने जयसिंगपूरच्या विकासाची जबाबदारी अधिक वाढली आहे.
गेल्या सहा वर्षांत जयसिंगपूर ही ब वर्ग दर्जाची नगरपालिका असूनही महानगरपालिकेच्या तोडीस तोड सुविधा नागरिकांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. पाणीपुरवठा योजना, अंडरग्राउंड गटार व्यवस्था, दर्जेदार रस्ते, भव्य नगरपालिका इमारत, शाहू स्टेडियम अशा सुविधा शहरात उभारण्यात आल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर येत्या ९ तारखेपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याची घोषणाही करण्यात आली. यावेळी बारामतीच्या विकास मॉडेलचा उल्लेख करत, जयसिंगपूरला बारामतीप्रमाणे सक्षम, आधुनिक व सुविधा-संपन्न शहर बनवण्याचा मानस व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य व रोजगारनिर्मितीवर भर देत नगरपालिका शाळांचे डिजिटायझेशन, मॉडेल शाळा उभारणी तसेच ८०० बेडच्या रुग्णालयामुळे शहराच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षभेद विसरून ‘मी जयसिंगपूरकर’ या भावनेतून काम करत शहराला आदर्श नगरपालिकेच्या दिशेने सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी न्यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक आणि लहान बालकाने शिवगर्जना देऊन सर्वांना उत्साहित केले. प्रारंभी स्वागत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी केले. यावेळी नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी स्वाक्षरी करून पदभार स्वीकारला.
यावेळी सावकर मादनाईक, मिलिंद भिडे, अमरसिंह निकम, प्रकाश झेले, नंदकुमार बलदवा, शितल गतारे, संभाजी मोरे, प्रकाश झेले, ॲड संभाजी नाईक, रमेश यळगुडकर, राजेंद्र नांद्रेकर यांच्यासह नूतन नगरसेवक गिरमल परगोंडा कोळी, तेजश्री राहुल पाटील-यड्रावकर, रूपाली राहुल बंडगर, सचिन महावीर चौगुले, मिनल रोहित नांद्रेकर, सचिन आप्पासाहेब निटवे, शकुंतला कांतीलाल मछले, लक्ष्मण शंकर गोसावी, सुमय्या सुलेमान कडबी, बजरंग मनोहर खामकर, महेश प्रदीप कलकुटगी, स्वाती सागर मादनाईक, उज्वला उत्तम वाघवेकर, पराग शामराव पाटील, अशोक मनोहर मळगे, तब्बसुम अस्लम फरास, अर्जुन उर्फ राजीव तानाजी देशमुख, अनुराधा राजेंद्र आडके, गीता संतोष भोसले, अर्चना विद्यासागर आडगाणे, लता गाडेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नगरपालिका अधिकारी प्रमोद पाटील यांनी मानले.