सर्वच बांधकाम कामगारांना संच द्या ; आमदार यड्रावकर यांची कामगार मंत्री यांच्याकडे मागणी

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संचाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार यड्रावकर यांनी कामगार मंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी कामगार मंत्री फुंडकर यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी हा प्रश्न लवकरच तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून स्वागतार्ह आहे. मात्र मागील पाच वर्षांपूर्वी अत्यावश्यक व सुरक्षा संच मिळालेल्या अनेक कामगारांकडे सद्यस्थितीत हे साहित्य वापरण्यायोग्य राहिलेले नाही. कारण या संचातील साहित्याचा वापर कालावधी मर्यादित असतो. त्यामुळे अशा जुन्या नोंदणीकृत कामगारांना नव्या संचाच्या लाभापासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरेल.
तसेच, सध्याच्या धोरणानुसार केवळ १० लाख बांधकाम कामगारांनाच अत्यावश्यक व सुरक्षा संच वाटप करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिणामी, जवळपास तीनपट बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहणार असून, यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगाराला संच मिळणे आवश्यक असल्याचे धोरण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बांधकाम कामगारांचे आरोग्य, सुरक्षितता व सामाजिक न्याय लक्षात घेता ठराविक कालावधीनंतर सर्व नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप गरज असल्याचे आमदार यड्रावकर यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या संचांचा वापर कालावधी संपुष्टात आल्याने संबंधित कामगारांना पुन्हा नव्या संचाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी कामगार मंत्री आकाषजी फुंडकर यांनी यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत ज्या बांधकाम कामगारांच्या वर अन्याय होत आहे, त्यांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केल्याने लवकरच बांधकाम कामगारांची मागणी पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.