शिरोळ तालुक्यातील पाझर तलावांना नव संजीवनी

Loading

आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून २ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील दानोळी, हरोली आणि घोसरवाड या तीन गावांतील पाझर तलावांच्या दुरुस्ती आणि विकासासाठी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून एकूण २ कोटी २० लाख ७८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या पाझर व साठवण तलाव योजना या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे या तलावांची अवस्था बिकट झाली होती. पाणीसाठा कमी होणे, गाळ साचणे, पिचिंग खराब होणे तसेच तटबंदीची झालेली झीज यामुळे या तलावांच्या दुरुस्तीची अत्यंत गरज निर्माण झाली होती. ही गरज ओळखून आमदार यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून घेतला.
या निधीतून दानोळी पाझर तलाव दुरुस्तीला ८८ लाख, हरोली पाझर तलावाला ४८ लाख २६ हजार, तर घोसरवाड पाझर तलाव दुरुस्तीला ८४ लाख ५१ हजार रुपये मंजूर झाले आहेत. या दुरुस्तीमुळे तलावांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होऊन परिसरातील शेतीला मोठा फायदा होणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा तुटवडा जाणवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
तलाव दुरुस्तीच्या कामामध्ये तलाव परिसरातील झाडे-झुडपे हटवणे, जुन्या पिचिंगचे काढकाम, तलावात एचडीपी पेपर टाकणे, त्यावर मुरूम टाकून दर्जेदार पिचिंग लावणे, तसेच काँक्रीटमध्ये सांडवा बांधकाम अशी महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे तलावाच्या भिंती मजबूत होतील, गळती थांबेल आणि पाणीसाठा दीर्घकाळ टिकून राहील.
याबाबत बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील पाझर तलावांचे महत्त्व लक्षात घेता त्यांची दुरुस्ती ही काळाची गरज होती. या तलावांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळतो. मंजूर झालेल्या निधीमुळे या तलावांना नवसंजीवनी मिळेल. त्यांनी या निधी मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभारही मानले आहेत.